
फलटण :- पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी गेली तब्बल ४२ वर्षे प्रामाणिकपणे पार पाडणारे नाव म्हणजे ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे.
सन १९८४ मध्ये बारामती येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक केकावली मधून कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. अनिल साबळे आणि माजी खासदार अमर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या लेखणीची धार अधिक तीक्ष्ण केली.
यानंतर १९८७ साली फलटण येथे त्यांनी साप्ताहिक गंधवार्ता ची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली हे वृत्तपत्र सातत्याने प्रगती करत राहिले आणि १९९४ मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर करून त्यांनी पत्रकारितेत नवा आदर्श निर्माण केला.
गेल्या चार दशकांहून अधिक काळात त्यांनी निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली आहे. लाचखोरी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, अतिक्रमण, आरोग्य सुविधा आणि महिलांवरील अन्याय अशा अनेक ज्वलंत विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांच्या प्रभावी लेखणीमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळाला आणि प्रशासनालाही सतर्क व्हावे लागले.
राजकीय लेखनात त्यांच्या खास शैलीची छाप दिसून येते. म्हणी, पद्यात्मक मथळे आणि प्रभावी मांडणी यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या मनात घर करते. चांगल्या निर्णयांना पाठबळ देतानाच चुकीच्या धोरणांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. या प्रवासात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, मात्र न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल देत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले.
पत्रकारितेसोबतच त्यांनी संघटनात्मक कार्यातही मोलाची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे संचालक तसेच सातारा जिल्हा वृत्तपत्र मालक-मुद्रक-संपादक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. पत्रकारांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी लढा दिला. फलटण एस.टी. आगाराच्या कारभाराविरोधातील आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतला.
आंबेडकरी चळवळीतही त्यांनी सक्रिय योगदान दिले. दलित पॅंथरच्या स्थापनेपासून सामाजिक न्यायासाठी ते सातत्याने लढत राहिले. अन्यायाविरोधातील चळवळींना शासन दरबारी पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी आपल्या लेखणीतून केले.
त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला आहे. २०१२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा सन्मान, २०१७ मध्ये भीमस्फूर्ती पुरस्कार, २०१९ मध्ये मूकनायक पुरस्कार आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘ज्येष्ठ संपादक दर्पण’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणाऱ्या आणि पत्रकारितेचा आदर्श जपणाऱ्या शामराव अहिवळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळो आणि त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी राहो, हीच सदिच्छा.





