गोष्ट सांगतो ऐका…: कॅश

0
18
गोष्ट सांगतो ऐका…:  कॅश


अरविंद जगताप5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कॅमेरावाला आठवडाभर आयोगाच्या लोकांसोबत फिरत होता. पण, एकाच्याही गाडीत पैसे सापडले नव्हते, म्हणून तोही वैतागला होता. आज पहिल्यांदा पैसे सापडणार होते…

ऋषी नेहमीपेक्षा खूप उशिरा निघाला होता घरातून. खरं तर उन्हाचा तडाखा चुकवायचा म्हणून तो रोज एक तास आधीच निघतो. साहेब पण खुश असतात. साहेब म्हणजे फक्त ऋषीचे साहेब. त्यांचा पक्ष पंधरा वर्षे झाली सत्तेत आलेला नाही. साहेब तसे प्रामाणिक. त्यात मध्यमवर्गीय. त्यामुळं कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नाही. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत अपक्ष उभे होते. पडले. समोरच्या उमेदवारापेक्षा त्यांचा जनसंपर्क जास्त. पण, त्या उमेदवाराने घरोघरी जाऊन पैसे वाटले.

…तर ऋषी त्यांच्या ऑफिसमधे काम करतो. साहेब पडले, तरी त्यांनी लोकांची कामं करणं सोडलं नाही. त्यामुळं ऋषी बिझी असतो. त्यात यावेळी साहेबांनी विधानसभेला उभं राहायचं ठरवलं. नेहमीप्रमाणं अपक्ष. पण, साहेबांनी यावेळी पूर्ण जोर लावला आहे. ऋषी पण खूप धावपळ करतोय. साहेब निवडून आले तर त्याचं आयुष्य बदलून जाणार आहे. आजकाल रात्री तो हेच स्वप्न बघत असतो.. साहेब आमदार झालेत.. तो त्यांच्या बरोबर मिरवणुकीत उभा आहे.. मंत्रालयात जातोय.. लोक काम घेऊन येताहेत.. लोक त्याला पण साहेब म्हणताहेत… स्वप्न सुद्धा माणसाला खुश करतात काही काळ. लोक श्रीमंत झाल्यासारखे खुश होतात. ऋषी तसाच खुश होता. उन्हाची पर्वा न करता आपली स्कूटी चालवत होता. आज त्याला एक पार्सलही पोचवायला सांगितलं होतं साहेबांनी. महत्त्वाची जबाबदारी होती. ऋषी वेगात निघाला होता. त्याने सिग्नल क्रॉस केला आणि नेमके दोन-तीन लोक आडवे आले. ऋषीने नाराजीने गाडी थांबवली. एक कॅमेरावाला समोर आला. ऋषीच्या लक्षात आलं की, हे निवडणूक आयोगाचे लोक आहेत. तो प्रचंड वैतागला. पण, आता थांबला होता. निवडणूक ड्युटीवर असलेले लोक म्हणाले, ‘गाडीची डिक्की उघडा..’ कॅमेरावाला शूटिंग करत होता. ऋषी काही क्षण फक्त कॅमेऱ्याकडं बघत राहिला.

रात्रीच ऋषीने स्वप्न पाहिलं होतं.. त्याचे साहेब आमदार झालेत.. दहा-पंधरा वेगवेगळ्या चॅनलचे लोक आलेत कॅमेरे घेऊन.. साहेबांच्या बाजूला आपण उभे आहोत.. सगळ्या चॅनलवर आपण दिसतोय.. त्याची गर्लफ्रेंड मैत्रिणींना तो व्हिडिओ दाखवतेय.. मैत्रिणी तिच्या नशिबावर जळताहेत.. पण, यातलं काही झालं नाही. चॅनल सोडून निवडणूक आयोगाचा कॅमेरा समोर आला. ऋषी असा एकटक, मख्खपणे बघतोय, याचा आयोगाच्या माणसाला राग आला. त्याने जरा रागातच ऋषीला गाडीची डिकी उघडायला सांगितली. ऋषीने गाडीची चावी काढली. तो विचार करू लागला.. आयोगाच्या लोकांना कळत नव्हतं की, यात विचार करण्यासारखं काय आहे? एक फाटका दिसणारा तरुण एक जुनाट स्कूटी घेऊन निघालाय.. आयोगाचे लोक अशा लोकांनाही अडवतात. प्रोसेसचा भाग आहे म्हणतात. एरवी माणसं गुपचुप थांबतात. सगळी तपासणी करू देतात. पण, ऋषी त्यांना वेगळा वाटत होता. त्यांची कुठलीच गोष्ट तो ऐकायला तयार नव्हता. निवडणूक ड्युटीवर असलेल्या लोकांना जरा संशय यायला लागला.

त्यांनी पुन्हा ऋषीला थोडं दरडावून सांगितलं.. ‘डिक्की उघड!’ पण, ते सोडून ऋषी त्यांनाच समजावून सांगू लागला.. आपण साधा माणूस आहोत, आपल्याला का त्रास देता? अशी गयावया करू लागला. आता मात्र निवडणूक ड्युटीवाले लोक वैतागले होते. एक तर दहा-पंधरा लोकांची तपासणी केली, त्यांचं शूटिंग केलं आणि दिलं सोडून. विषय संपला. पण, आता हे प्रकरण त्यांच्यासाठी संशयास्पद होत होतं. ऋषी डिकी उघडायला टाळाटाळ करत होता. ड्युटीवाल्या माणसाने पुन्हा एकदा प्रेमानं सांगून पाहिलं.. ‘पटकन डिक्की उघड. आम्ही फक्त प्रोसेसचा भाग म्हणून हे करतोय. तुझ्याकडं कॅश नसेल, तर तुला घाबरायचं काय कारण आहे?’ पण, ऋषी काही ऐकत नव्हता. मग मात्र आयोगवाले भडकले. ते ओरडून बोलल्यावर ऋषीने डिकी उघडायचा प्रयत्न सुरू केला. चावी फिरवत राहिला, पण डिकी उघडत नव्हती. आता काही लोक पण हे सगळं बघायला गोळा झाले. ऋषी पुन्हा आयोगवाल्यांना सांगू लागला.. ‘डिक्कीत पैसे आहेत, पण ती आपली कष्टाची कमाई आहे. त्या पैशांचा निवडणुकीशी काही संबंध नाही. ते मी तुम्हाला घेऊ देणार नाही..’ निवडणूक ड्युटीवाले आता खूपच वैतागले होते. ते ताबडतोब डिकी उघडायचा आग्रह करत होते. ऋषी सारखा सारखा त्यांना, ‘माझी कष्टाची कमाई आहे..’ असं सांगत होता. बाचाबाची सुरू होती. ऋषी त्यांना म्हणाला, ‘सत्ताधारी लोकांच्या गाड्या तपासा ना.. तुम्हाला आम्हीच दिसतो का? आमचेच पैसे जप्त करायची ड्युटी आहे का तुमची?’ लोक उत्सुकतेने बघत होते. ऋषी चांगलाच अडकला, हे त्यांच्या लक्षात येत होतं. त्यातल्या काही लोकांना ऋषीचं म्हणणं पटतही होतं. पण, आयोगाच्या लोकांसमोर त्याची बाजू घेणं शक्य नव्हतं. आयोगाचे लोक म्हणाले, ‘भंकस करू नको. जे सांगितलं ते कर..’ ऋषी आता रागात ‘नाही’ म्हणाला. त्याचं म्हणणं होतं.. घरखर्च, मेडिकल असे सगळे खर्च वजा केल्यावर जे पैसे उरतात, ते गेल्या तीन वर्षापासून तो साठवतोय. आता तेच घबाड तुमच्या हाती एवढं सहजासहजी कसा देऊ? एवढं मन मारून साचलेले पैसे तुम्हाला नाही देऊ शकत..

ऋषी तावातावानं बोलत होता. कॅमेरामन दिवसभर शूटिंग करत असतो. पण, त्याला पहिलीच अशी केस भेटली होती. खरं तर कॅमेरावाला आठवडाभर आयोगाच्या लोकांसोबत फिरत होता. पण, एकाच्याही गाडीत पैसे सापडले नव्हते, म्हणून त्यालाही वैताग आला होता. आज पहिल्यांदा पैसे सापडणार होते. शूटिंग करायला मजा येणार होती. खूप वेळ ऋषीची बडबड ऐकून निवडणूक ड्युटीवाले लोक कंटाळले होते. त्यांनी आता थेट चावीच घेतली त्याच्या हातातून. ऋषी ओरडत राहिला.. माझी कष्टाची कमाई आहे.. कॅमेरा बंद करा.. वाटलं तर अर्धे पैसे तुम्ही ठेवा.. पण, आता एवढे लोक गोळा झाले होते की, निवडणूक ड्युटीवाल्याला कारवाई करायची खुमखुमी आली. कॅमेरावाला अँगल धरून उभा राहिला. डिकी उघडली गेली. त्यात मोजून तीस रुपये होते. खूप बारकाईने तपासणी झाली. पण, एकूण फक्त तीस रुपये होते. निवडणूक ड्युटीवाला म्हणाला, ‘तीस रुपये होते, तर एवढं काय घाबरत होता?’ ऋषी म्हणाला, ‘कष्टाची कमाई असली की त्रास होतो साहेब..’ कॅमेरामन म्हणाला, ‘अरे, पण येवढं फुटेज कशाला खात होता? आम्हाला वाटलं खरंच घबाड सापडणार आता..’ ऋषी म्हणाला, ‘सगळा खर्च जाऊन एवढेच उरतात साहेब. हे घबाडच आहे आमच्यासाठी.. आयोगाला कळावं म्हणू थोडं फुटेज खात होतो. माझी कॅश नेऊ ना परत?’ निवडणूक ड्युटीवाल्यांना हसावं का रागावावं, कळत नव्हतं.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link