Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: ...अन्यथा, ऱ्हास अटळ आहे!

रसिक स्पेशल: …अन्यथा, ऱ्हास अटळ आहे!

रसिक स्पेशल:  …अन्यथा, ऱ्हास अटळ आहे!

[ad_1]

समीर गायकवाड14 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

उत्तम कथा, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमूल्ये, अफलातून लोकेशन्स आणि चोख मार्केटिंग यांच्या बळावर दाक्षिणात्य सिनेमांचा यशोरथ वेगाने धावतोय. त्याला आवर घालण्याची चर्चा करण्याऐवजी हिंदी आणि मराठी सिनेमांनीही तशी धाव घेण्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी ‘पुष्पा’च्या आडून येणाऱ्या हाका सावधपणे ऐकल्या पाहिजेत !

अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा – द रुल’ हा सिक्वेलपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत. मूळच्या तेलुगू भाषेतील या सिनेमाने एव्हाना भारतीय सिनेमांच्या उत्पन्नाचे आजवरचे रेकॉर्ड मोडले आहेत. हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पहिल्या आठवड्यात एक हजार कोटींची कमाई करणारा तो पहिला सिनेमा ठरला आहे. वास्तविक या सिनेमात व्हीएफएक्स आणि धमाकेदार अॅक्शनची स्टाइलबाज मांडणी वगळता विशेष काही नाही. त्यातील गाणीही पहिल्या भागाच्या तुलनेत जास्त लोकप्रिय झाली नाहीत. मग तरीही तो इतकी कमाई कशी काय करू शकला?

मार्केटिंग, पब्लिसिटीचे यश ‘पुष्पा’चे हे यश त्याच्या तुफान मार्केटिंग आणि माऊथ पब्लिसिटीमध्ये आहे. प्रदर्शनापूर्वीच केवळ टिझर आणि ट्रेलरच्या माध्यमातून तसेच ब्रँड पब्लिसिटीतून जवळपास शंभर कोटींची कमाई या सिनेमाने केली. देशभरातील विविध शहरांत तसेच विदेशांतही भव्य-दिव्य पब्लिसिटी कॅम्पेन केले गेले. या सिनेमाच्या डोळे दीपवणाऱ्या कमाईचे गणित विक्रमी स्क्रीन ब्लॉकिंग आणि बुकिंगमध्येही दडले आहे. देशभरातील शेकडो थिएटर या सिनेमासाठी आधीच ब्लॉक केले गेले, तर काही हजार स्क्रीन बुक करण्यात आले. ‘पुष्पा’ रिलीज होईल, तेव्हा प्रेक्षकांना दुसऱ्या सिनेमांचे फारसे ऑप्शन राहणार नाहीत, याची दक्षता वितरकांकडून घेतली गेली. काही मेट्रो शहरांत पहिल्या ठराविक दिवसांत तिकीट दरही वाढीव ठेवले गेले. जोडीला टीव्ही चॅनल, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया तसेच गॉसिपिंगमधून ‘पुष्पा’ सतत चर्चेत राहील, याची नीट खबरदारी घेतली गेली. अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे या सिनेमाने केलेली विक्रमी कमाई!

आशय, शैली अन् तंत्राचे नावीन्य ‘पुष्पा – दोन’चे हे आर्थिक यश एखादा सिनेमा काढताना व्यावसायिक गणिते कशी मांडावीत, याचे उत्तम उदाहरण ठरावे. या तुलनेत फार कमी हिंदी सिनेमे अशी अफाट कमाई करतात. या वर्षी आलेल्या सिनेमांमध्ये चांगल्या कमाईच्या बाबतीत अॅनिमल, लापता लेडीज, तसेच पठाण, जवान, गदर- भाग दोन अशी काही मोजकी नावे घेता येतील. मात्र, दक्षिणेकडील सिनेमे विलक्षण प्रमाणात तिकीटबारीवर कमाई करताहेत. लोकमानसाला भिडणारा आशय, वेगळ्या व्यक्तिरेखा, अनोखी शैली आणि नव्या तंत्रज्ञानाचा नेमका वापर यामुळे त्यांना हे यश मिळत आहे, ते कमी लेखता येणार नाही. एस. एस. राजामौलींचा ‘आरआरआर’, अभिनेता यशचा अॅक्शनपट ‘केजीएफ-२’ आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमांनी देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर जे गारुड केलं, तशी संधी हिंदी चित्रपटांनाही होती; मात्र तिचे सोने करता आले नाही.

हिंदी सिनेमे का मागे पडले? दक्षिणेच्या मानाने हिंदी सिनेमा मागे पडलाय, हे मान्यच करावे लागेल. एक काळ होता, जेव्हा सगळीकडे केवळ येऊ घातलेल्या हिंदी सिनेमांची चर्चा असायची. त्यातली गाणी, सीन, संवाद, अॅक्शन, तांत्रिक वैशिष्ट्य यांची माहिती झळकत राहायची. ही वातावरणनिर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे, तरीही आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, याबद्दल लोकांमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही. उलट दक्षिणेकडील कोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत, त्यांचा ‘यूएसपी’ काय आहे, याविषयी लोक भरभरून बोलतात. दाक्षिणात्य सिनेमांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे, याची अलीकडे चर्चा होते. त्यातून धडा घेत हिंदी सिनेमानेही थोडीफार कूस बदलायला सुरूवात केली आहे. ओटीटीवरील तसेच नियमित हिंदी सिनेमांच्या आशय- विषयात याचे प्रतिबिंब दिसू लागले आहे. वितरण, विपणन पद्धतीतही बदल होत आहेत. या गोष्टींमुळे फरक पडला आणि त्यात सातत्य राहिले, तरच हिंदी सिनेमांचे जुने दिवस परत येतील.

मराठी सिनेमा कुठं आहे..? या सगळ्याच्या तुलनेत मराठी सिनेमा कुठे दिसतो, याचे उत्तर निराशाजनक आहे. त्याच त्या साचेबद्ध कथा, त्यातील त्याच बंदिस्त व्यक्तिरेखा, त्या साकारणारे तेच ते चेहरे, प्रयोगशीलतेचे दुर्भिक्ष्य आणि कमालीचे कल्पनादारिद्र्य असलेले सादरीकरण! अशा पठडीबद्ध सिनेमांकडे मराठी प्रेक्षकही हल्ली फारसा वळत नाही, तिथे तो अन्य भाषांमध्ये जावून कमाईचा विक्रम वगैरे करेल, ही कल्पनाही कुणी करणार नाही. त्यातही एखाद्याने वेगळा प्रयोग करत, नव्या दमाच्या लोकांना घेऊन, कसदार आशयाचा सिनेमा काढला तर त्यालाही यश मिळत नाही, कारण त्याची काहीच पब्लिसिटी झालेली नसते. त्याला किमान पन्नास स्क्रीनही मिळत नाहीत, हेही वास्तव आहे. ही सगळी विलक्षण साचलेपणाची, उदासीनतेची लक्षणे आहेत. शंभर वर्षांहून मोठा वारसा असलेल्या मराठी सिनेमाच्या परिघात शंभर कोटीची कमाई करणारा ‘सैराट’चा एकच सुवर्णबिंदू आहे. अलीकडे तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण – डोंबिवली इतकेच मराठी सिनेमाचे क्षेत्र उरलेय की काय, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. ग्रामीण तसेच निमशहरी नागरजीवनाचे फारसे प्रतिनिधित्व तो करत नाही. मग त्या भागातील लोक मराठी सिनेमावर फुली मारत असतील, तर त्यात त्यांचा दोष नाही.

विजय सेथूपती अभिनित ‘महाराजा’ हा मल्याळी सिनेमा चिनी भाषेत डब होऊन चार हजार स्क्रीनवर रिलीज होतो आणि मराठी सिनेमा आपल्याच राज्यात स्क्रीन्स मिळत नाहीत म्हणून रडत राहतो. असे का होतेय, याचे उत्तर शोधताना केवळ प्रेक्षकांच्या माथ्यावर खापर फोडून मोकळे होता येणार नाही. त्यासाठी मराठी सिनेक्षेत्राने कठोर आत्मपरीक्षण करुन स्वत:ला मुळापासून बदलले पाहिजे. अन्यथा, ऱ्हास अटळ आहे! ‘पुष्पा’ हा खूप दर्जेदार सिनेमा आहे, असा याचा मुळीच अर्थ नाही. उलट तो एक टिपिकल भडक, बटबटीत नि काहीसा ओंगळवाणा सिनेमा आहे, असे म्हणता येईल. तथापि, उत्तम कथा, बांधीव पटकथा, भिडणारा आशय, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मितीमूल्ये, अफलातून लोकेशन्स आणि चोख मार्केटिंग या गोष्टींच्या बळावर एकूणच दाक्षिणात्य सिनेमांचा यशोरथ वेगाने धावतोय. त्याला आवर घालण्याची चर्चा करण्याऐवजी हिंदी आणि मराठी सिनेमांनीही तशी धाव घेण्याची तयारी केली पाहिजे. त्यासाठी ‘पुष्पा’च्या आडून येणाऱ्या हाका सावधपणे ऐकल्या पाहिजेत!

संपर्कः sameerbapu@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments