
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढली असून शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शनिवारी तापमानात मोठी घट झाली. तर पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवले गेले. या ठिकाणी ४.४ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात ८.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहात वाढ झाली असून त्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात कडक्याची थंडी व धुके पडण्याची शक्यता आहे.