
सोशल मीडियाच्या या प्रभावकाळात भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न अधिक गडद होत आहेत. भौतिक सुविधांनी घरे संपन्न होत असताना कुटुंबात, नात्यात, त्यात गुंतलेल्या मनांमध्ये मात्र रितेपणा येतो आहे. हा विरोधाभास दूर सारत आयुष्य सकस बनवण्यासाठी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. पुणे पुस्तक महोत्सवाने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या यशानंतर राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे दुसरा, अधिक मोठा आणि दिमाखदार महोत्सव १४ ते २२ डिसेंबरदरम्यान होत आहे. त्याची सुरूवात ११ डिसेंबरला “शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ या अनोख्या उपक्रमाने झाली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक प्रकाशन संस्था आणि विक्रेत्यांची दालने साहित्याचा अनमोल खजिना वाचकांपुढे खुला करणार आहेत. मराठीला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठीजनांनी दहा वर्षे केलेल्या पाठपुराव्याची ही फलश्रुती आहे. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाला अधिक उस्फूर्त प्रतिसाद लाभेल. या महोत्सवात मराठीबरोबरच देशातील अन्य भाषांची तसेच विदेशी भाषांतील विपुल पुस्तके अनुवादित स्वरूपात उपलब्ध असतील. देश-विदेशात जसे दरवर्षी चित्रपट महोत्सव होतात, नाट्य आणि संगीत महोत्सवांचे आयोजन होते, तसे पुस्तक महोत्सव भरवले जात नाहीत. ही उणीव पुणे पुस्तक महोत्सवाने यशस्वीपणे भरून काढली आहे. एेतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गणेशोत्सव, सवाई गंधर्व संगीत महोत्सव आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आदी सांस्कृतिक सोहळे पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचे नेहमीच आकर्षण असते. त्यात आता ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चाही समावेश होईल. हा महोत्सव आणि पुणेकरांच्या पुस्तक वाचनासारख्या उपक्रमामुळे भविष्यात पुण्याला ‘पुस्तकप्रेमींचे शहर’ अशी ओळखही लाभेल. बदलत्या काळात वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी अशा प्रकारच्या पुस्तक महोत्सवांना वेगळे महत्त्व आले आहे. टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटच्या या जमान्यात माणसांना बघे बनवणाऱ्या समाजमाध्यमांचा पूर आला असताना वाचन संस्कृती कशी टिकवायची आणि न वाचणाऱ्यांना वाचनाकडे कसे वळवायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी विविध उपाय करावे लागतील. सांस्कृतिक कार्यक्रम आणि लेखक -वाचक भेटींसह आयोजित होणारे असे भव्य पुस्तक महोत्सव हा त्यापैकी एक प्रभावी उपाय ठरू शकतात. प्रत्येक साक्षर आणि सुशिक्षित माणसाने सुसंस्कृत, बहुश्रुत बनून देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम वाचक तरी झालेच पाहिजे. त्यासाठी दररोज शक्य होईल तितके वाचन केले पाहिजे. कारण पुस्तके माणसांना जे ज्ञान, जी दृष्टी देतात, ती चित्रपट, नाटक वा संगीतातून मिळेलच असे नाही. पुस्तक वाचन म्हणजे लेखक ललित साहित्यातून जे जीवनविश्व उलगडतो किंवा ललितेतर साहित्यातून जे वैचारिक ज्ञान देतो, त्याच्याशी आपले अनुभव आणि ज्ञान पडताळत वाचक आपल्या मनात त्याचे प्रतिरुप उमटवतात. अशा स्थितीत वाचक हा लेखकस्वरूप होतो आणि पुस्तक हे या एकात्म अनुभूतीचे साधन ठरते. ही आदर्श वाचन प्रक्रिया आहे, ती पुस्तकांच्या वाचनातूनच आत्मसात करता येते. त्यासाठी प्रत्येक मुलावर आईवडिलांनी किंवा शाळेने जाणीवपूर्वक आणि मुलांची जिज्ञासा जागृत करीत वाचन संस्कार करावे लागतात. पुढच्या आयुष्यात अशी वाचन संस्कारित पिढी केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर सुजाण, सजग आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून देशाचाही आधार होऊ शकते. आता अभिजात दर्जा लाभलेली मराठी पुढील काळात तरुणाईसाठी जगातील नवे ज्ञान – तंत्रज्ञान शिकवणारी आणि रोजगार देणारी भाषा झाली पाहिजे, तरच ती इंग्रजीच्या तोडीची समर्थ भाषा होईल. पण, त्यासाठीची पहिली अट मात्र वाचन हीच आहे. त्यामुळे अशा पुस्तक महोत्सवांच्या उद्देशामध्ये, मराठी आणि अन्य अभिजात भाषांच्या साहित्याचे स्वतंत्र दालन असण्याला व तिचे सांस्कृतिक कार्यक्रमातून दर्शन घडवण्यालाही स्थान असले पाहिजे. आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा महत्त्वाच्या ज्ञानशाखांची आणि संविधान व कायदा, महापुरुषांची व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके अशी वैचारिक तसेच माहितीपर पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होतील, याकडेही आयोजकांनी लक्ष द्यायला हवे. वाचन संस्कृतीद्वारे बहुश्रुत, विज्ञाननिष्ठ आणि देशप्रेमी नागरिक घडवण्याचे काम मुख्यत: सरकारचे आहे. ‘गाव तिथे वाचनालय’ या ध्येयापासून अजूनही महाराष्ट्रातील सुमारे तीस हजार गावे वंचित आहेत. शिवाय, शालेय ग्रंथालयांना नियमितपणे नवी पुस्तके पुरवली जात नाहीत. अनेक शाळांमध्ये ग्रंथपालांची पदे रिक्त आहेत, त्यांच्या सन्मानजनक वेतानाचा प्रश्नही प्रलंबित आहे. खरे तर हा सरकारी तिजोरीवरचा खर्च नव्हे, तर ही मानव विकासासाठीची आणि उद्याचा समाज व देश घडवण्यासाठीची गुंतवणूक आहे. त्यासाठी सरकारने आणि प्रागतिक समाज म्हणून आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. पुण्यातून गावोगावी पोहोचावी वाचनसंस्कृतीची ज्ञानगंगा… सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालये ही वाचन संस्कृती वाढवण्याची महत्त्वाची माध्यमे आहेत. ती अधिक परिपूर्ण आणि पुस्तकांनी संपन्न होऊन त्या गावात, तिथल्या शाळांमध्ये वाचन संस्कृती अधिक विकसित होण्यासाठीही ‘पुणे पुस्तक महोत्सव’ मोठे योगदान देऊ शकतो. त्यासाठी महोत्सवाच्या आयोजकांनी या काही पुढाकारांबाबत विचार करावा… – विविध शहरांत पुस्तक महोत्सव आणि वाचन उपक्रम घेण्यासाठी स्थानिक संस्थांना मार्गदर्शन करणे. – सार्वजनिक वाचनालयांचे तसेच शालेय ग्रंथपाल आणि भाषा शिक्षक यांच्यासाठी वाचन प्रशिक्षण कार्यशाळा घेणे. – विद्यार्थी आणि सामान्य वाचकांवर वाचन संस्कार करण्याविषयी मार्गदर्शन करणे. – राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा आयोजित करणे. – आठवड्यात किमान एक पुस्तक वाचणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना बक्षिसे देणे. – विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवण्यासाठी अशाच स्पर्धा शिक्षकांसाठीही घेणे. (संपर्कः laxmikant05@yahoo.co.in)
Source link