
या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ३६ तासात किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चेन्नई ते कन्याकुमारीपर्यंत १५ ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते १६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीचा मध्य भाग जसे पुद्दुचेरी, कराईकल, नागपट्टिनम, तोंडी, तूतीकोरिन सारख्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे होणारा मुसळधार पाऊस राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पसरू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. यामुळे त्रिची, मदुराई, तंजावूर, इरोड, करूर, तिरुपूर, कोईम्बतूर आणि उटी मध्ये तीव्र परिस्थिती उद्भवू शकते. केरळ, कर्नाटकातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.





