डायरीची पाने: डाकेकरी

0
14
डायरीची पाने:  डाकेकरी




भांड्या-कुंड्यांना डाग देऊन दुरूस्त करण्याचं काम डाकेकरी करायचे. घरोघर असं काम निघायचंच. त्यामुळं गावकरी डाकेकऱ्याची वाट बघायचे. आमच्या गावात पूर्वी महिना-पंधरा दिवसाला हयातनगरवरुन एक ‘डाकेकरी’ यायचा. तो चावडीवर त्याचं दुकान लावून बसायचा. दुकान म्हणजे काही विक्रीला आणलेल्या वस्तू नसत, तर एक विस्तवाची भट्टी आणि त्याला हवा घालून फुलवणारा पंखा. हा पंखा हातानं फिरवता यायचा आणि विस्तव खवखवत राहायचा. एक ऐरण, एक हातोडा, एक कडची आणि डाग देण्याच्या काही गोष्टी.. उदा. कथील, राळ आणि आणखी एक दोन वस्तू, हे त्याचं दुकान असायचं. मुस्लिम समाजातील एक वयस्कर माणूस आणि त्याचा तरुण मुलगा असे दोघे जण हे दुकान लावत. आल्या आल्या मुलगा भट्टी शिलगावायचा. तोवर वडील गावात फिरून हाळी द्यायचे. ‘डाकेकरी चावडीवर आलाय होss घागरी, दुरड्या, बादल्या, पोहोरे गळत असतील तर डाग देऊन घ्या होss’ असा आवाज देत ते सगळ्या गावातून एक फेरी मारायचे. मग लोक आपली गळकी भांडी घेऊन चावडीवर आणून ठेवायचे आणि शेतात आपापल्या कामाला निघून जायचे. संध्याकाळी शेतातून लोक परत आले की चावडीवरून त्या वस्तू घेऊन जायचे. मग डाकेकरी आपल्या गावाला म्हणजे हयातनगरला निघून जायचा. तो दिवस सुटीचा असेल, तर आम्ही काही दोस्त-मुलं दिवसभर चावडीवर खेळताना हा भांड्यांना डाग कसा देतो, कल्हई कसा करतो, गळकी भांडी कशी दुरुस्त करतो, हे सगळं बघत बसायचो. ‘अागीच्या थिलंग्या उडतील, तुम्हाला पोळतील..’ असं म्हणून हा डाकेकरी आम्हाला जवळ बसू देत नसे. पण, आम्ही ज्या कौतुकानं त्याच्या कामाकडं बघत असू, त्याच कौतुकानं तोही आमच्याकडं पाहात असे. त्यामुळं त्याची भीती वाटायची नाही की रागही यायचा नाही. आम्ही आपली उत्सुकता शमवण्यासाठी तो काय काय आणि कसं कसं करतो, ते बारकाईनं बघत राहायचो. पन्नास वर्षांपूर्वीचा हा काळ. तेव्हा ग्रामीण भागात जातीपातीची उतरंड तशीच होती. गावात प्रत्येक जातीचा एक आड होता. पण, सवर्ण जातींसाठी एकच मोठा आड होता. तो आमच्या दारात होता. गावाच्या वरच्या बाजूला एक आड होता; पण तिथलं पाणी पिण्यासारखं नव्हतं. त्यामुळं पिण्यासाठी सगळा गाव इथूनच पाणी न्यायचा. सांडीउंडीसाठी तिकडच्या आडाचं पाणी तिथले लोक वापरत. आमच्या दारासमोरच्या आडाचं पाणी खूप गोड लागतं, असं सगळे लोक म्हणायचे. हा आड फार खोल नव्हता, पण तो कधीच आटला नाही, अशी गावातली म्हातारी माणसं सांगत. बहात्तरच्या दुष्काळात पाण्याचे सगळे स्रोत आटले, मात्र हा आड आटला नव्हता. गावातल्या माणसांना तर तो पुरून उरलाच, पण शिवारातली जनावरंही या आडानं त्या दुष्काळात जगवली. या आडाचे झरे सतत वाहते असायचे. म्हणून तिथं माणसांचा राबताही वाहता असायचा. बहात्तरच्या दुष्काळाचा तर मीही साक्षीदार आहे. आडाचं पाणी पोहऱ्यानं उपसून घागर भरणे आणि ती घागर डोक्यावर उचलून घरी रांजणात किंवा हौदात टाकून येणे, पुन्हा पोहऱ्यानं पाणी काढून घागर भरणे असं सुरू असायचं. अाडातून पाणी काढताना पोहरे आडाच्या भिंतीवर आणि कठड्यावर आदळायचे. त्यामुळं त्यांची बुडं फुटायची आणि पोहरा गळायला सुरूवात व्हायची. बऱ्याचदा पाणी वाहून वाहून घागरीच्या जोडावर दिलेले डाग निघून जायचे आणि त्या गळायला लागायच्या. डोक्यावरची चुंबळ आणि अंगावरचे कपडे भिजायचे. पाणी नेण्यासाठी कोणी बादली वापरायचे. घरातली आंघोळीची बादलीही आदळून आपटून गळायची. स्वयंपाकघरात आणि शेतात वापरल्या जाणाऱ्या टोपल्यांची बुडंही फुटायची. डाकेकरी अशा सगळ्या वस्तूंना, भांड्या-कुंड्यांना डाग देऊन दुरूस्त करण्याचं काम करायचे. घरोघर असं काम निघायचंच. म्हणून गावकरीही डाकेकऱ्याची वाट बघायचे. त्यामुळं महिना-पंधरा दिवसाला डाकेकरी आला की आख्खा दिवस तो कामात बुडून जायचा. संध्याकाळपर्यंत काम उरकूनच तो परत जायचा. फारच काम शिल्लक राहिलं, तर तो कधी कधी चावडीवरच मुक्काम करायचा. कुणी तरी त्यांना भाजी-भाकरी द्यायचं. ती खाऊन ते बापलेक तिथंच झोपायचे. सकाळी उठलं की लवकरच भट्टी पेटवून कामाला सुरूवात करायचे. आदल्या दिवशी बरंच काम केलं असल्यानं दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण दिवसभर त्यांना काम नसे. अशावेळी पत्र्याचे नवीन पोहरे तयार करून देण्याचं किंवा भांड्यांना कल्हई करण्याचं काम ते करून द्यायचे. वेळ आहे थोडा तर आणा भांडीकुंडी, असं ते पुन्हा एकदा गावात फिरून सांगत आणि लोकही पुढची-मागची गरज म्हणून काही वस्तू करून घेत. त्यांना दिवसभर पुरण्याइतकं काम देत असत. भांड्याला कल्हई करणे ही डाग देण्याइतकी आवश्यक गोष्ट नसायची. कल्हईअभावी काम अडून राहायचं नाही. पण, सवडीचं काम म्हणून प्रामुख्यानं तांब्या-पितळेच्या वापरातल्या वस्तूंना कल्हई करून घेतली जायची. कारण जेवताना वापरायची भांडी आंबट पदार्थांमुळं कळकत असत. त्यांचा मळ त्या पदार्थात उतरत असे. त्यामुळं कल्हई करून घेतली तर ते भांडं कळकत नसे. कधी कधी लोखंडाच्या तव्यालाही कल्हई करून घेतली जायची. कल्हई करणे म्हणजे त्या वस्तूला कथलाचा थर देणे. मूळ धातूवर या धातूचा थर दिला की ते भांडं कळकत नसे. पूर्वी असे कल्हई करून देणारे लोक गावोगाव फिरायचे. ‘चुडा तुझा सावित्रीचा’ नावाच्या जुन्या चित्रपटात जगदीश खेबुडकारांनी लिहिलेलं आणि जयवंत कुलकर्णींनी गायलेलं एक गाणंही मस्त होतं… ‘भांड्याला कल्हई, हो लावा भांड्याला कल्हई..’ हे गाणं आता कुठं ऐकण्यात येत नाही आणि भांड्याला कल्हई करून घेतानाही कुणी दिसत नाही. कारण कंपन्यांनीच मुळात कल्हई केलेली भांडी उत्पादन करायला सुरूवात केली आहे. आता गावागावात नळ योजना आल्या आहेत. लोकांनी घरोघर विंधन विहिरीही केल्या आहेत. परिणामी आडावर जाऊन सामूहिकरीत्या पाणी भरण्याचं काम हल्ली होत नाही. त्यामुळं आजच्या मुलांना हे असले गावातले सार्वजनिक आड ओस पडलेले, कचऱ्यानं भरलेले दिसतील. कारण त्यांचा कोणी फारसा वापरच करत नाही. त्यांचा उपसाही होत नाही. त्यामुळं शेवाळलेलं काळं-निळं पाणी अशा जुन्या आडातून पाहायला मिळतं. गावोगावीचे असे आड आपलं वैभव आठवत दीनवाण्या चेहऱ्यानं स्वतःला जमिनीत गाडून घेतात. इकडं लोक मात्र हापसून घरोघरी पाणी भरतात, नाही तर ठरल्या वेळी नळाला येणारं पाणी भरून ठेवतात. अनेक ठिकाणी सरळ घराच्या छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवलं जातं. त्यामुळं घागरी आणि पोहरे या वस्तू इतिहासजमा झाल्या आहेत. ज्या ज्या वस्तू आता वापरात आहेत, त्या सगळ्याच प्लास्टिकच्या मिळत असल्यामुळं लवकर फुटत नाहीत आणि फुटल्या तर त्याच्यासाठी डाकेकरी लागत नाही. त्या भंगारतच टाकून द्याव्या लागतात. त्यामुळं डाकेकरी ही जमातही इतिहासजमा झाली आहे. तांबटकरी, डाकेकरी हे शब्द आता नव्या पिढीच्या कानावरही पडणार नाहीत. (संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link