Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: पदकांचा दुष्काळ संपला; पण...

रसिक स्पेशल: पदकांचा दुष्काळ संपला; पण…

[ad_1]

प्रशांत केणी6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

स्वप्निल कुसाळेने नेमबाजीत कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला. खाशाबा जाधव यांच्यानंतर आपल्याला असे पदक आणायला ७२ वर्षे लागली. त्यामुळे हरियाणा, पंजाबप्रमाणे ऑलिम्पिकपटू घडवण्यात महाराष्ट्र का कमी पडतोय, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

हेलसिंकीमध्ये महाराष्ट्राचे कुस्तीपटू (स्व.) खाशाबा जाधव यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं. त्यानंतर महाराष्ट्राला दुसरा ऑलिम्पिक पदक विजेता घडवायला ७२ वर्षे लागली. स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत कांस्यपदक जिंकून हा पदकांचा दुष्काळ संपवला. अन्य राज्यांनी घडवलेले ऑलिम्पिक पदक विजेते किंवा किमान खेळाडूंची संख्या पाहता, देशाच्या लोकसंख्येत फक्त दोन टक्के वाटा असलेल्या हरियाणाने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्र असल्याने राज्याच्या क्रीडा क्षेत्रात ‘आनंदी आनंद गडे..’ असे वातावरण आहे. पण, देशाच्या लोकसंख्येत दुसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राचं हे यश पुरेसं आहे का?

मर्यादित लक्ष्य, सीमित योगदान :
पॅरिस ऑलिम्पिकला हरियाणाचे २४ आणि पंजाबचे २२ क्रीडापटू पात्र ठरले होते. त्या तुलनेत महाराष्ट्राचे फक्त पाच. खाशाबांचा वारसा सांगणाऱ्या या राज्यातून ऑलिम्पिकच्या तोडीचा एकही कुस्तीपटू घडत नाही. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकावी आणि शासकीय नोकरी-लाभ मिळवावे, एवढेच मर्यादित लक्ष्य कुस्तीपटू बाळगतात, ही शोकांतिका नव्हे तर काय? स्वप्निलशिवाय राज्याच्या अन्य खेळाडूंची कामगिरी पाहता; अविनाश साबळे ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. या फेरीत ८ मिनिटे १४.१८ सेकंद वेळेसह तो ११ वा आला. या गटातील तीन पदक विजेत्यांची वेळ ८ मिनिटे ०७ सेकंदांहून कमी आहे. अविनाशची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८ मिनिटे ०९.९१ सेकंद आहे. हा फरक महत्त्वाचा आहे. बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टीने सात्त्विक साईराजसोबत उपांत्यपूर्व फेरी गाठली, तिरंदाज प्रवीण जाधव आणि उंचउडीपटू सर्वेश कुशारे पहिल्याच फेरीत बाद झाले. महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंपैकी कुसाळे रेल्वेत, तर साबळे व जाधव सेनादलात आहे. देशाच्या क्रीडा धोरणात रेल्वे आणि सेनादलाला स्वतंत्र राज्यांचा दर्जा आहे. म्हणजेच, या तिघांच्या यशाच्या प्रवासात फक्त महाराष्ट्राचंच योगदान आहे, असे छातीठोकपणे म्हणता येत नाही.

‘ऑलिम्पिक’ हेच ध्येय का नाही?
ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी पाहता; हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, कुस्ती, बॉक्सिंग, टेनिस अशा आठ क्रीडा प्रकारांतच आपण पदके मिळवली आहेत. हुकलेली पदके आणि भविष्यातील आशा यांचा विचार केला तर ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांची ही संख्या १५ पर्यंत जाते. मग आपल्या राज्यात लक्ष्याधारित प्रयत्न का होत नाहीत? गेल्या वर्षी गाजावाजा करीत महाराष्ट्र ऑलिम्पिकचे पुनरुज्जीवन केले गेले. पण, यामध्ये ४० क्रीडा प्रकारांचा समावेश कशासाठी केला आहे? शालेय क्रीडा प्रकार पाहता हा आकडा शंभरी गाठतो. त्यात संगीत खुर्चीसारख्या मनोरंजनाच्या प्रकारासह ४० टक्के अगम्य क्रीडा प्रकार आहेत. मग क्रीडा संस्कृती नांदावी म्हणून काहीतरी खेळावं, हे ब्रीद जपण्यापेक्षा ‘ऑलिम्पिक पदक जिंकूया..’ हा आपला नारा का नसावा?

देशात पुढे, परदेशात मागे का?
गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळवतोय. गोव्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी २३० पदके जिंकली. हे यश कौतुकास्पदच आहे. पण, ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या संख्येपासून आपल्या क्रीडापटूंच्या कामगिरीत मात्र खूप तफावत दिसते. खाशाबांनंतर दुसरा ऑलिम्पिक विजेता घडवण्यासाठी इतका उशीर लागला, तो याचमुळे. दोन टक्के लोकसंख्येच्या हरियाणाने देशाचे ३५ टक्के ऑलिम्पिक पदकविजेते कसे घडवले? खेळाडूंना परिपूर्ण प्रशिक्षण सुविधा, नोकऱ्या, बक्षिसे ही त्यांची बलस्थाने आहेत.

नेमबाजी हे ‘टार्गेट’ का नाही?
महाराष्ट्राच्या दृष्टीने सर्वाधिक सकारात्मकता नेमबाजीत आहे. २००० च्या ऑलिम्पिकमध्ये अंजली भागवतने, तर २००४ मध्ये सुमा शिरूरने अंतिम फेरी गाठली होती. गेल्या काही वर्षांत विश्वजीत शिंदे, दीपाली देशपांडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, रुद्रांक्ष पाटील असे अनेक नेमबाज आंतरराष्ट्रीय क्षितिजावर गाजत आहेत. सुमा आणि दीपाली राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. मग या क्रीडा प्रकारावर आणखी लक्ष केंद्रित करायला नको का?

राज्यातील अनेक भागांतून क्रीडापटू उदयास येताहेत, हे चित्र नक्कीच आशादायक आहे. अशा सगळ्याच नव्या दमाच्या खेळाडूंना ऑलिम्पिक दर्जाचं प्रशिक्षण आणि भक्कम पाठबळ दिलं पाहिजे. आता मिळालेल्या यशात धन्यता मानून, राज्याची क्रीडा संस्कृती यशस्वी झाली, असा अभिमान बाळगत राज्यकर्ते आणि संघटक स्वत:ची पाठ थोपटवून घेतील. पण, खरी गरज आहे, ती आपण जगाच्या आणि देशाच्या तुलनेत कुठे आहोत, हे नीट तपासण्याची. त्यासाठी कठोर आत्मपरीक्षण करण्याची!

ऑलिम्पिक दर्जाचं काय?
स्वप्निलच्या रुपाने ऑलिम्पिक पदकविजेता घडवला, याचं श्रेय घेण्यात क्रीडा प्रबोधिनीही पुढं आहे. पण, इतक्या वर्षांत हा एकमेव पदक विजेताच का घडवता आला, याचं विश्लेषण कोण करणार? ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षक प्रबोधिनीत कार्यरत आहेत का? तिथल्या प्रशिक्षणाचा स्तर ऑलिम्पिक दर्जाचा आहे का? खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आणि प्रशिक्षकांचं मानधन त्या स्तराचं आहे का? असे असंख्य प्रश्न त्यामुळं उपस्थित होतात.

(संपर्कः prashantkeni@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments