Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: चीनच्या अंतरंगाचा ठाव घेणारे ‘केपीएस’

वेध मुत्सद्देगिरीचा…: चीनच्या अंतरंगाचा ठाव घेणारे ‘केपीएस’

वेध मुत्सद्देगिरीचा…:  चीनच्या अंतरंगाचा ठाव घेणारे ‘केपीएस’

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

के. पी. एस. मेनन

गिरीजा शंकर बाजपेयी यांच्या मुशीत भारतीय मुत्सद्यांची जी फळी तयार झाली, त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले परराष्ट्र सचिव कुमार पद्मनाभ शिवशंकर (के. पी. एस.) मेनन. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात इतिहासाचे अध्ययन करत असतानाच ते ‘ऑक्सफर्ड मजलिस एशियन सोसायटी’चे सदस्य बनले.

भारतीय संस्कृतीचा प्रसार करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. या संघटनेच्या वतीने मेनन यांनी भारतीय स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या सरोजिनी नायडू, श्रीनिवास शास्त्री आणि लोकमान्य टिळक यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या या राजकीय सक्रियतेमुळे ब्रिटिशांच्या मनात त्यांच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यांचे विचार क्रांतिकारी आहेत, असे ब्रिटिशांना वाटत होते. ब्रिटिश पोलिसांच्या अहवालानुसार, मेनन यांनी ब्रिटिशांविषयी असणारा संताप कधीही लपवला नव्हता. १९२२ मध्ये भारतीय नागरी सेवेची (ICS) परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मेनन यांनी स्वातंत्र्याची आसही कधीच सोडली नाही.

भरतपूर राज्याचे दिवाण म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या मेनन यांची १९३४ मध्ये झांजिबार, केनिया आणि युगांडा येथील भारतीयांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या दरम्यान त्यांनी जागतिक राजकारणातील साम्राज्यवादी आणि वसाहतवादी मानसिकतेचा जवळून अनुभव घेतला. ब्रिटिशांनी आफ्रिकेतील भारतीयांविषयी राबवलेल्या धोरणाविरोधात उद्रेक होणार, याची जाणीव त्यांना झाली होती.

म. गांधींच्या भाषणाने आणि विचाराने प्रभावित झालेल्या मेनन यांची, भारत दीर्घकाळ ब्रिटिश साम्राज्याचा भाग राहणार नाही, अशी ठाम धारणा होती. या धारणेतूनच त्यांनी आपल्या कौशल्याचा आणि अनुभवाचा उपयोग जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. जागतिक आणि भारतीय राजकारणात झालेल्या आमूलाग्र बदलांचे ते साक्षीदार बनले. १९४३ ते ४८ पर्यंत चीनमध्ये एजंट-जनरल, १९४८ ते ५२ पर्यंत भारताचे पहिले परराष्ट्र सचिव आणि १९५२ ते ६१ पर्यंत सोव्हिएत महासंघामध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

चीनविषयी असणारा गाढा अभ्यास आणि विलक्षण अनुभव ही मेनन यांची सर्वांत जमेची बाजू होती. आपल्या ‘मेनी वर्ल्डस् : अॅन ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकात त्यांनी चीनमधील अनुभव विस्ताराने कथन केले आहेत. आजही त्यांचे अनुभव तितकेच प्रासंगिक आहेत. मेनन यांच्या मते, चीन आणि भारत शेजारी देश असले किंवा दोघेही पौर्वात्य संस्कृती जपणारे असले, तरीही व्यावहारिक पातळीवर चीनला हाताळणे पाश्चिमात्त्य देशांपेक्षा अधिक कठीण आणि गुंतागुंतीचे आहे. हिंदू, बुद्ध आणि ख्रिश्चन ज्याप्रमाणे स्वतःला या विश्वाचा भाग समजतात, त्याप्रमाणे चीन स्वतःला या विश्वाचा भाग समजत नाही. किंबहुना, आपल्याशिवाय दुसरे जग अस्तित्वातच नाही, अशी चीनची प्रबळ धारणा असल्याचे निरीक्षण मेनन यांनी मांडले. चिनी समाजावर बौद्ध तत्त्वज्ञानापेक्षा कन्फ्युशियस तत्त्वज्ञानाचा जास्त प्रभाव आहे. चिनी समाज प्रामुख्याने भौतिकवादी असून, भारतीय समाजाप्रमाणे चिनी समाजावर धर्माचा प्रभाव किंचितही जाणवत नाही, असे त्यांचे मत होते. किंबहुना बहुसंख्य चिनी नागरिकांचा कोणताही धर्मच नाही, उलटपक्षी तेथे एकाच कुटुंबात बौद्ध, कन्फ्युशियस, प्रोटेस्टंट आणि दाओवाद असे वेगवेगळे तत्त्वज्ञान अंगिकारणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. चिनी मानसिकता समजून घेण्यासाठी मेनन यांची ही निरीक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत.

मेनन ज्या काळात चीनमध्ये होते, तो काळ भारताप्रमाणेच अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा होता. चंग-काई-शेक यांच्या नॅशनॅलिस्ट गुओमिंदांग या पक्षाविरोधात कम्युनिस्ट पक्षाचे जोरदार आंदोलन सुरू होते. या आंदोलनातूनच १९४९ मध्ये माओ क्रांतीने जन्म घेतला. चीनच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा क्षण होता. या क्रांतीचा परिणाम चीनवरच नाही, तर भारतावरही झाला. त्यानंतर भारत-चीन संबंधामध्ये काय घडले, हा इतिहास सर्वज्ञात आहे. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भारतीय सामर्थ्यातही आमूलाग्र बदल झाले. परंतु, चिनी मानसिकता समजून घेण्याचे गंभीर प्रयत्न भारतात अपवादानेच झाले. चिनी राज्यकर्त्यांचे धोरण समजून घ्यायचे असल्यास भू-राजनीती, जागतिक राजकारण, तेथील नेतृत्व, पक्षपद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहेच. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे तो चीनला प्रभावित करणाऱ्या कन्फ्युशियस तत्त्वज्ञानाचा अभ्यास. या मूलभूत वास्तवाची जाणीव मेनन यांना होती आणि तेच त्यांचे बलस्थान होते. तथापि, आजही चिनी समाजाची मानसिकता समजून घेताना मेनन यांच्या या महत्त्वाच्या निरीक्षणाकडे आपले दुर्लक्षच होत आहे.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments