भूषण महाजन40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गेले वर्षभर भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार एका वेगळ्या उत्साहात, जल्लोषात होते. ‘हात लावीन तिथे गुदगुल्या’ या धर्तीवर ‘बोट लावीन तिथे नफाच नफा’ असे सामान्य गुंतवणूकदारांचे झाले होते. संपूर्ण जग मंदीच्या गोष्टी करीत असताना आपल्या हातात चारही एक्के असणे, असा कपिलाषष्ठीचा योग भारतीय अर्थव्यवस्थेत आणि पर्यायाने शेअर बाजारात आला होता. आजही इंग्लंड आणि जपान तांत्रिक आर्थिक मंदीत आहेत. (लागोपाठच्या दोन तिमाहीत अर्थव्यवस्था आकुंचन पावली तर ती मंदीत आहे, असे मानण्यात येते). या स्थितीत अमेरिका कधी पांढरे निशाण दाखवते, याची तज्ज्ञ वाट पाहात होते. पण, युद्धामुळे संरक्षण क्षेत्राला आलेली उभारी आणि एआय व संबंधित क्षेत्रात आलेली नवी तेजी यामुळे तेथील बाजाराला, पर्यायाने अर्थव्यवस्थेला सावरले.
भारतात मात्र मंदी कुठे दिसत नाही. चारचाकी वाहनांची मागणी अबाधित आहे. त्यातही ग्राहकांचा ओढा महाग गाड्यांकडे आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांची मागणी कमी झाली म्हणावे, तर तसेही दिसत नाही. बजाज, हिरो, होंडा, टीव्हीएस सर्वच वाहन कंपन्या आपापली कामगिरी उंचावत आहेत. सोने – चांदी बाजार, चैनीच्या वस्तूंच्या बाजारपेठा ग्राहकांनी ओसंडून जात आहेत. एका बाजूला चीनच्या बांधकाम क्षेत्राचा बँड वाजलेला आहे, तर आपल्याकडे व्याजदर वाढ बोचत असली, तरी बांधकाम क्षेत्र दहा वर्षांची मरगळ झटकून जोमाने नवनवे प्रोजेक्ट हाती घेत आहे. काय आहे या सगळ्याचे रहस्य?
अर्थव्यवस्थेच्या तेजीची 5 प्रमुख कारणे
1. सरकारी धोरण, गेल्या पाच वर्षांतील सुधारणांचा रेटा, पायाभूत सुविधांमध्ये सरकारतर्फे सतत होणारी गुंतवणूक यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. तसेच उत्पादन केंद्रित अनुदान योजना, आत्मनिर्भर भारताची घोषणा, सरकारी उद्योगांना त्यांची कामगिरी सुधारण्यास दिलेले प्रोत्साहन. ‘आयबीसी’ आणि ‘एनसीएलटी’च्या अंमलबजावणीतून प्रवर्तकांकडून होत असलेली कर्जवसुली या सर्व प्रयासांमुळे गेल्या तीन दशकात प्रथमच कंपन्यांचा कर्जभार कमी झाला आहे. एकेकाळी भांडवलाच्या पटीत असलेले कर्ज आता भांडवलाच्या ६० टक्क्यांवर आले आहे. तसेच सरकारची अंदाजपत्रकी तूटही आटोक्यात आहे, ती पुढे क्रमश: कमी होत जाईल, असे सध्याचे चित्र आहे.
2. जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतात आहे. सरासरी वय ३० च्या आत आहे. या सर्व तरुणाईच्या गरजा आणि आकांक्षा नव्या मागणीला वाट देत आहेत. त्यातूनच असे दिसते की, सूचिबद्ध कंपन्यांची विक्री आणि नफा वाढता आहे. डिसेंबरच्या तिमाहीचे जाहीर झालेले निकाल या गोष्टीची ग्वाही देतात.
3. कोरोना काळानंतर अमेरिकेने आणि तिचे अनुकरण करीत उर्वरित जगाने अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पैसा ओतला. त्यामुळे सर्वकष तेजी सुरू झाली. भारतीय नवा / जुना गुंतवणूकदार देशाच्या प्रगतीवर विश्वास ठेऊ लागला. २०२० मध्ये ३ हजार कोटींवर असलेला मासिक ‘एसआयपी’चा ओघ चार वर्षात १९ हजार कोटींवर पोहोचला. यामुळेच परदेशी संस्थांनी वारेमाप विक्री करुनही शेअर बाजार स्थिर राहिला. २०२३ मध्ये जेव्हा त्यांनीही पुनर्खरेदी सुरू केली तेव्हा तर शेअर बाजाराने नवे उच्चांक गाठले.
4. आणखी एका महत्त्वाच्या बाबीची नोंद करायला हवी. गेल्या वर्षी प्रथमच भारताचे दरडोई उत्पन्न २६०० डॉलरच्या वर गेले आहे. यापूर्वी चीन आणि कोरियाचे दरडोई उत्पन्न २५०० डॉलरवर गेल्यानंतर पुढच्या ५ वर्षात तेथील अर्थव्यवस्था दुप्पट झाली होती. चीनमध्ये २००७ मध्ये हे स्थित्यंतर घडले. त्यावेळी साडेतीन लाख डॉलर असलेला चीनचा ‘जीडीपी’ आज सहापट वाढला आहे. भारताचा हा अमृतकाळ आहे, असे म्हणतात ते कदाचित यामुळेच. पुढील पंचवीस वर्षात आपल्या अर्थव्यवस्थेची वृद्धीही अशीच होत राहील, असा अंदाज आहे.
5. भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीचे आणखी एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी. ‘यूपीआय’मुळे पैशाची देवाणघेवाण अत्यंत सुलभ झाली आहे. जन-धन योजनेतून उघडलेली कोट्यवधी खाती तसेच ‘यूपीआय’मुळे छोट्या आणि कुटीर व्यवसायांना मिळालेले बँकिंगचे पाठबळ याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी छोट्या टपऱ्यादेखील त्यांच्या व्यवसायातील रोकड प्रवाहाच्या सामर्थ्यावर छोटी कर्जे घेऊ लागल्या आहेत.
वेग वाढला की धोकेही वाढतात
ऊस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये, असे म्हणतात. पाहता पाहता छोट्या कंपन्यांचे भाव आकाशाला भिडले. मार्च २०२३ मध्ये ८ हजार ६०० असलेला स्मॉल कॅप २५० निर्देशांक वर्षभरात १५ हजार ५०० झाला. म्हणजे जवळपास दुप्पट. त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याची जाणीव पहिल्यांदा अर्थतज्ज्ञांना आणि पाठोपाठ नियामकांना झाली. तेजीचा अतिरेक होऊन शेअर बाजारात मोठी घसरण झाली, तर लहान गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ नये, म्हणून सर्व स्मॉल कॅप फंडांना ‘सेबी’ने एक स्ट्रेस टेस्ट करण्यास सांगितले. म्हणजे निर्देशांक चुकून २५ टक्के खाली आले, तर हातातले शेअर विकून गुंतवणूकदाराला त्याचे भांडवल मिळेल का? याची तपासणी. येथे हे लक्षात घेतले पाहिजे, की छोट्या शेअर्समध्ये तरलता कमी असते. मोठे व्यवहार करावे लागले तर समोर खरेदीदार असेलच असे नाही. शेअर थोड्या खालच्या भावात विकावे लागतात. शेअर बाजाराच्या भाषेत त्याला ‘इम्पॅक्ट कॉस्ट’ म्हणतात.
साहजिकच, तंबूत घबराट पसरली. त्या जोडीला मार्च महिना आलेला, त्यामुळे आगाऊ कर भरण्याची घाई सुरू होती. शेअर बाजारातील जोखमीची जाणीव एकदमच सर्व घटकांना झाली. त्यामुळे गेला आठवडा अत्यंत खळबळजनक असा गेला. लार्ज कॅप शेअर्स आणि पर्यायाने निफ्टी व सेन्सेक्स दोनच टक्के खाली आले असले, तरी स्मॉल कॅप निर्देशांक १२.५ टक्के खाली आला. रोज वरच जाणारे गुंतवणूकदारांचे लाडके शेअर्स (त्यात रेल्वे, सरकारी बँका आणि उद्योग व त्या व्यतिरिक्त टिप्सद्वारे आलेले ‘ड’ दर्जाचे शेअर्स हे सारेच आले) वीस ते तीस टक्के घसरले. त्यामुळे ‘थप्पड का बुरा नहीं लगता साहिब, भरोसा टूटता हैं..’ या वृत्तीने गुंतवणूकदार निराश झाले की काय, अशी शंका येऊ लागली.
खरं तर शेअर बाजारात शिरकाव करण्याची वाट अनेक गुंतवणूकदार पाहात होते. बाजार खाली आला तर खरेदी करू म्हणणारे आता तो आणखी खाली आला तर बघू, असं म्हणत आहेत. पण, त्यांना एकच सल्ला आहे.. जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; जी पाहता पाहता जपानच्या बरोबरीला येईल, तिच्या प्रवाहात सहभागी होण्याची संधी सोडता कामा नये. दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकदाराने मध्ये येणारे स्पीड ब्रेकर पाहून बिचकून जाऊ नये. भारताच्या आंतरिक ऊर्जेवर, क्षमतेवर भिस्त ठेऊन निर्भीडपणे गुंतवणूक करावी. संपत्ती आणि समृद्धीचा हाच मार्ग आहे.
(संपर्कः kreatwealth@gmail.com)





