Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रवेध मुत्सद्देगिरीचा...: परराष्ट्र धोरणाचा पाया मजबूत करणारा द्रष्टा

वेध मुत्सद्देगिरीचा…: परराष्ट्र धोरणाचा पाया मजबूत करणारा द्रष्टा

वेध मुत्सद्देगिरीचा…:  परराष्ट्र धोरणाचा पाया मजबूत करणारा द्रष्टा

[ad_1]

डॉ. रोहन चौधरी4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

गिरिजा शंकर बाजपेयी

भारत स्वतंत्र झाला तेव्हा इतिहासाचे ओझे, वर्तमानातील समस्या आणि भविष्याची चिंता या तीनही पातळीवर देशाची कसोटी सुरू होती. इतिहास बदलण्याची ताकद नसली तरी आपल्या अनुभवाच्या जोरावर इतिहास घडवण्याची क्षमता असणारे असंख्य भारतीय यातून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्या परीने योगदान देत होते. त्यामधील मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणजे गिरिजा शंकर बाजपेयी.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पं. नेहरूंना परराष्ट्र धोरणात रुची होती आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात त्याला आकार देण्याची त्यांना संधी मिळाली. बाजपेयी यांच्या कारकीर्दीचेही अगदी असेच वर्णन करता येईल. देश पारतंत्र्यात असताना आणि स्वतंत्र झाल्यावरही देशासाठी आपले योगदान देण्याची दुर्मिळ संधी खूप कमी व्यक्तींना लाभते. बाजपेयींना ती लाभली. या संधीचे सोने करत त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाने आपल्या नावाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यास जणू इतिहासालाच भाग पाडले.

जयपूर संस्थानात न्यायमंत्री असणाऱ्या सीताप्रसाद बाजपेयी यांचे चिरंजीव गिरिजा शंकर बाजपेयी हे १९१४ मध्ये सर्वात कठीण अशी भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९२३ मध्ये शिक्षण, आरोग्य आणि भूमी विभागात अवर सचिव म्हणून दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांची नियुक्ती व्ही. एस. श्रीनिवास शास्त्रींचे स्वीय सहायक म्हणून झाली. शास्त्रींचा स्वीय सहायक या नात्याने बाजपेयींनी १९२१ ची वासाहतिक परिषद, १९२२ मध्ये वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आलेली शस्त्र नियंत्रण परिषद आणि ‘लीग ऑफ नेशन’ या महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभाग घेतला. हा अनुभव म्हणजे त्यांच्या कारकीर्दीतील सर्वांत मोलाचा ठेवा होता.

‘प्रवासी भारतीय’ हा शास्त्रीजींचा आत्मीयतेचा मुद्दा बाजपेयींनीही तितक्याच आत्मीयतेने उचलून धरला. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी प्रवासी भारतीय विषयाचे तज्ज्ञ म्हणून ब्रिटिश आमदानीत त्यांनी नावलौकिक मिळवला होता. १९२४ मध्ये प्रवासी भारतीय विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शास्त्रीजींनी प्रवासी भारतीयांच्या प्रश्नांवर घेतलेली भूमिका आणि ब्रिटिशांचे त्याबाबतचे धोरण या विषयावर बाजपेयींनी ‘स्थलांतरित आणि ब्रिटिशांचे धोरण’ या आशयाचे पुस्तक लिहिण्याची इच्छा ब्रिटिश सरकारकडे व्यक्त केली. परंतु, भारत सरकारचे उपसचिव सर रॉबर्ट युबंक यांनी सरकारी खर्चाने औपचारिकरीत्या पुस्तक लिहिण्यास विरोध केला. बाजपेयींचा या विषयावरील गाढा अभ्यास पाहता वादग्रस्त संदर्भ समाविष्ट न करण्याची हमी देऊनही सरकारने याला विरोध केला.

तथापि, आपला स्वतःचा ब्रिटिश आमदानीतील प्रभाव वापरून बाजपेयींनी संक्षिप्त, परंतु स्पष्ट शब्दांत ब्रिटिशांच्या धोरणाविषयी ‘इंडिया टुडे’मध्ये लेखमाला लिहिली. या लेखमालेचे रूपांतर पुस्तकामध्ये करण्यात आले. पण, बाजपेयींचे नाव न छापता हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकातून त्यांनी ब्रिटिश सरकारचे दुटप्पी धोरण जगसामोर आणले. जगाला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चर्चिलने केनियातील भारतीयांच्या बाबतीत अवलंबलेल्या धोरणावर त्यांनी थेट टीका केली. चुकीला चूक आणि योग्य गोष्टीला योग्य म्हणणे हे बाजपेयींचे बलस्थान होते.

या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्या काळातील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे चालून आल्या. १९२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सचिव, १९२६ आणि १९३० मध्ये वासाहतिक परिषदेतील प्रतिनिधी मंडळाचे सल्लागार, १९२९ आणि १९३० मध्ये ‘लीग ऑफ नेशन’मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभाग, १९२९ मध्ये संयुक्त सचिव, १९३२ मध्ये आफ्रिकेतील ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’मध्ये महत्त्वाची भूमिका आणि १९४० मध्ये शिक्षण, आरोग्य व भूमी विभागाचे पहिले भारतीय प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९४१ मध्ये भारताचे अमेरिकेतील एजंट-जनरल (राजदूत) ही जबाबदारीही त्यांना देण्यात आली.

पारतंत्र्यामध्ये असूनही आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रवासी भारतीयांचा आवाज उठवणाऱ्या बाजपेयींचे भारतीय परराष्ट्र धोरणातील योगदान अनन्यसाधारण आहे. वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे तीनही पुत्र उमा शंकर बाजपेयी (परराष्ट्र सचिव), दुर्गा शंकर बाजपेयी आणि कात्यायनी शंकर बाजपेयी (अमेरिका, पाकिस्तान, चीनमधील भारताचे राजदूत) यांनीही स्वातंत्र्यानंतर देशाच्या परराष्ट्र सेवेत आपले योगदान दिले. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे. गिरिजा शंकर बाजपेयींचे कार्य स्वातंत्र्यानंतरही अविरत सुरू होते. होमी भाभांची आण्विक क्षेत्रामध्ये आणि सुकुमार सेन यांची निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये जशी त्यांच्या असामान्य कार्यामुळे ओळख आहे, तशी ओळख भारताच्या परराष्ट्र धोरणात गिरिजा शंकर बाजपेयींना लाभली. पं. नेहरूंच्या विदेशनीतीला सत्यात उतरवण्यासाठी ज्या सक्षम परराष्ट्र विभागाची आवश्यकता होती त्याच्या निर्मितीमध्ये बाजपेयींचे योगदान अनन्यसाधारण होते.

(संपर्कः rohanvyankatesh@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments