सुहास किर्लोस्कर3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘ओटीटी’वर अनेक उत्तमोत्तम चित्रपट, वेबसिरीज अगदी घरबसल्या बघता येतात. अशा स्थितीत या प्लॅटफॉर्मवर काय पाहावं आणि काय टाळावं याचं तारतम्य महत्त्वाचं ठरतं. ते असेल तर मनोरंजनासोबत ज्ञानाचीही कवाडेे उघडून जगाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळू शकते. त्यासाठी ‘ओटीटी’वरच्या काही वेचक – वेधक चित्रपट अन् वेबसिरीजची ओळख करून देणारे हे नवे पाक्षिक सदर.
या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने घोषित झाली आहेत. त्यामध्ये पाच उत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये ‘सोसायटी ऑफ द स्नो’ या स्पॅनिश चित्रपटाचा समावेश आहे. १९७२ मध्ये रग्बी टीमला घेऊन चिलीला निघालेले उरुग्वेच्या एअर फोर्सचे विमान दक्षिण अमेरिकेच्या ‘अँडीज’ पर्वतरांगांमध्ये कोसळले. विमानातील ४५ प्रवाशांपैकी १६ जण ७२ दिवसांच्या खडतर परिश्रमानंतर बचावले. त्यातील दोघांनी १५ हजार २६० फूट उंच ट्रेकिंग केले, ३८ मैलांचा प्रवास दहा दिवस केला. त्यामुळे ते बर्फाळ प्रदेशातून बाहेर पडून इतर १४ सहकाऱ्यांसाठी मदत मागवू शकले. हे विमान कोसळले तो अँडीज पर्वतरांगांचा भाग निर्मनुष्य होता. बर्फाळ प्रदेशातील आव्हानांचा सामना या प्रवाशांना करावा लागला. ७२ दिवसांमध्ये एकेक सहकारी मरणपंथाला लागलेला असताना अन्नाचा तुटवडा, बर्फाची वादळे, शारीरिक, मानसिक त्रास अशा संकटांचा सामना त्यांनी कसा केला असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
रॉबर्ट कनेसा हा मेडिकलच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी त्या रग्बी टीमचा भाग होता. तो या संकटातून वाचला आणि त्याची ही कथा पाब्लो व्हर्सी या पत्रकाराने लिहिली. त्या पुस्तकावर आधारित ‘सोसायटी ऑफ द स्नो’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
‘पर्वतरांगांमध्ये ७२ दिवस’ असे सांगितल्यामुळे त्यातील आव्हानांची कल्पना कादंबरीमध्ये वाचता येते, पण चित्रपटात तशीच दृश्ये उभी केल्यामुळे प्रेक्षक म्हणून आपणही त्या साहसी मोहिमेचा भाग बनतो. बर्फाळ प्रदेशात ७२ दिवस वास्तव्य करताना पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागते. खाण्यासाठी जवळपास अन्न – वनस्पती नसतात. पहिल्या आठ दिवसांत सोबतचे खाद्यपदार्थ संपल्यावर जगण्यासाठी अन्न आणि जिवंत राहण्यासाठी ऊर्मी कुठून मिळवणार हा मोठा प्रश्न असतो. त्याचे वास्तववादी चित्रण करताना दिग्दर्शक जे. ए. बयोना यांनी विषयाशी बांधिलकी कायम ठेवली आहे.
या चित्रपटातील सगळे कलाकार लॅटिन आहेत आणि ते उरुग्वेची स्पॅनिश भाषा बोलतात हे विशेष. ‘ओटीटी’वर हा चित्रपट इंग्रजी भाषेत इंग्रजी सबटायटलसह बघता येतो. तत्पूर्वी अँडीज पर्वतरांगांची माहिती घेण्यासाठी ‘Earth Longest Mountain Range : The Andes’ ही डॉक्युमेंटरी यूट्यूबवर बघणे श्रेयस्कर ठरेल. दिग्दर्शकाने त्या पर्वतरांगांमध्ये चित्रण करताना त्यांची भव्यता, तिथल्या कठीण परिस्थितीमधील आव्हानांची अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. विमान अपघाताचे चित्रीकरण करताना त्या विमानासारखा सेट स्टुडिओमध्ये तयार करून अपघाताचे शूटिंग केल्यावर ते अँडीज पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट एका नायकाची कथा नाही, ते १६ जणांचे टीमवर्क आहे. पटकथा लेखक बर्नाट व्हिलाप्लाना आणि जेम मार्क्स यांनी प्रत्येकाची वेगवेगळी कथा न दाखवता त्या सर्वांनी एकत्रितपणे त्या कठीण प्रसंगाला कसे तोंड दिले हे दाखवले आहे. पेद्रो लूक यांनी सिनेमॅटोग्राफीमधून पर्वतरांगा दाखवताना त्यांच्या भव्यतेचे आणि त्या सर्व प्रवाशांपुढच्या आव्हानांचे चित्रण ज्या पद्धतीने केले आहे ते केवळ लाजवाब! या चित्रपटाला उत्तम हेअर स्टाइल आणि मेकअपसाठीसुद्धा ऑस्कर नामांकन मिळाले आहे. इतके दिवस बर्फाळ प्रदेशात वास्तव्य केल्यावर चेहऱ्यामध्ये होणारा बदल खूप बारकाईने टिपला आहे.
हा चित्रपट ‘ओटीटी’वर कधीही बघण्यास उपलब्ध असला, तरी तो एका बैठकीत बघितल्यास त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतात आणि चित्रपटाची परिणामकारकता जाणवते. तो बघताना अनेक प्रश्न पडतात. जीवनमरणाचा प्रश्न असेल तर योग्य आणि अयोग्य काय? नैतिक काय आणि चुकीचे काय? या संभ्रमाचा सामना त्या प्रवाशांप्रमाणेच प्रेक्षकांनाही करावा लागतो. आणि हेच या चित्रपटाचे यश आहे. याच साहसी घटनेवर काही चित्रपट, डॉक्युमेंटरी निघाल्या आहेत. त्यापैकी एक ‘अलाइव्ह’ (१९९३) हा चित्रपट प्राइमवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.
(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)







