Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: संमेलनाच्या इव्हेंटपेक्षा बोलीभाषांचा उत्सव व्हावा

रसिक स्पेशल: संमेलनाच्या इव्हेंटपेक्षा बोलीभाषांचा उत्सव व्हावा

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Puranvi Article | Dr Mahesh Keluskar On Marathi Literature Conference

डॉ. महेश केळुसकर11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमळनेरमधील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. अशा संमेलनांतून कसदार साहित्य निर्मितीला प्रेरणा आणि भाषेच्या संवर्धनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा असते. ती कितपत पूर्ण होते आणि त्यासाठी काय व्हायला हवे, यावर निवडक साहित्यिकांचेे हे भाष्य…

बोलीभाषा जपल्या, तरच मराठी टिकेल!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवाले मराठीच्या बोलीभाषांना महत्त्व द्यायला काही तयार नाहीत. ज्या भागात संमेलन होते, तिथल्या एखाद – दुसऱ्या बोलीवर एखादा परिसंवाद किंवा स्थानिक कार्यक्रम घेतला की झाले मोकळे! यातून मराठी भाषा आणि साहित्याचे संवर्धन, विकास कसा काय होणार? ‘भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण’ या ग्रंथाचे मुख्य संपादक डॉ. गणेश देवी यांच्या प्रतिपादनाप्रमाणे, ‘बोलीभाषाच नसतील तर एखादी मान्य भाषा केवळ अर्थविहीन आणि पुन्हा पुन्हा वापरून थकून गेलेले शब्द या स्वरूपातच शिल्लक राहिल.’ मराठीचे असे होऊ नये आणि मुख्य प्रवाहाला समृद्ध करीत मराठीची प्रगल्भता वाढवणाऱ्या तिच्या बोलींचा सन्मान व्हावा, जतन – संवर्धन व्हावे, असे मराठी भाषकांना वाटत असेल तर आता महाराष्ट्राच्या विविध भागांत स्वतंत्रपणे ‘बोलीभाषांचा लोकोत्सव’ दरवर्षी व्हायला हवा. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

उपलब्ध माहितीनुसार (संदर्भ : ‘बोलीभाषा : चिंता आणि चिंतन / संपादक : प्रेमानंद गज्वी आणि डॉ. महेश केळुसकर), मराठी भाषेत आतापर्यंत एकूण ६८ बोली (Dialects) आढळल्या असून, त्यांचे वर्गीकरण असे आहे – उत्तर महाराष्ट्र – ५, कोकण – १२, पश्चिम महाराष्ट्र – ५, विदर्भ – ३, मराठवाडा – २, आदिवासी – १५ आणि भटके विमुक्तांच्या बोली – २०. यातील काही बोलींचा लोक व्यवहारातील उपयोग क्षीण होत चालला आहे. काही तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. टप्प्याटप्प्याने या सर्व बोलींचा लोकोत्सवातील सहभाग वाढवून त्यांचे जतन आणि संवर्धन करीत मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध करणे शक्य आहे. कुठल्याही भाषेचा विकास हा तिच्या मौखिक कलेची वाढ आणि विस्तार, संदेशवहनाची गुणवत्ता आणि तिच्यातील ज्ञान क्षेत्रांची व्यापकता यावर अवलंबून असतो. आणि म्हणूनच मराठीच्या विकासासाठी तिच्या बोलींचा प्रमाणभाषेतील जास्तीत जास्त सहभाग, या बोलींच्या ध्वनी रूपांचे जतन, लिखित साहित्यातील वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी या बोलींना जोडून सुलभ संदेशवहन करणे अपरिहार्य ठरते.

बोलीभाषा काय किंवा प्रमाण मराठी भाषा काय, सगळ्यांची लिपी एकच आहे आणि ती म्हणजे देवनागरी (अपवाद गौंडी बोली) ही लिपी आपल्या मराठीपणाचा समान धागा आहे; ज्यामध्ये आपण सारे मराठी लोक गुंफले गेलो आहोत. बोली लोकोत्सवाच्या माध्यमातून सर्व बोलींमधील प्रातिनिधिक लोकगीते, लोककथा आणि संवादशैली यांचे ध्वनिमुद्रण करून मराठीचे उच्चारशास्त्र (फोनोलॉजी) जगभरातील अमराठी अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देता येईल. भाषेतील उच्चारांचा आणि त्यांच्या विकारांचा अभ्यास मराठी भाषकांच्या संवादाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हे काम अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आणि साहित्य संमेलनांच्या डोक्यापलीकडचे आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागानेच दरवर्षी दोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय तरतूद करून घेऊन राज्यभरात बोलीभाषा लोकोत्सव सुरू केले पाहिजेत.

संपर्क- डॉ. महेश केळुसकर
} ज्येष्ठ कवी, कादंबरीकार
}‘झिनझिनाट’, ‘अंधातर अंधारात’ काव्यसंग्रह
}‘क्रमशः’ कादंबरीसह ४० पुस्तके प्रकाशित
maheshkeluskar@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments