पुस्तक वार्ता: श्वास कविता, ध्यास कविता म्हणत अक्षरशः शब्दांवर जगणाऱ्या आकाशची अक्षरयात्रा!

0
15
पुस्तक वार्ता: श्वास कविता, ध्यास कविता म्हणत अक्षरशः शब्दांवर जगणाऱ्या आकाशची अक्षरयात्रा!


43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

जालन्यात आकाशच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

त्याला बोलता येत नाही. त्याला चालता येत नाही. तो एका खुर्चीवर बसून असतो. त्याच्या जगात कविता नसती, तर कदाचित आज तोही नसता. कवितेने त्याला तारले. त्याचा ध्यास कविता झाली. त्याचा श्वास कविता झाली. हेच ओळखून जालना येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष सुहास सदाव्रते यांनी त्याच्या कवितेला बळ दिले. अन् त्याचे पहिले पुस्तक आले. असा आगळावेगळा कवी म्हणजे आकाश देशमुख.

नियतीने असा काही डाव टाकला,की बोलणे अन चालणेच कायमचे बंद केले. ऐन बालपणात मनावर कोरलेली वेदनेची शिदोरी घेत आयुष्याकडे पाहणाऱ्या आकाशने या परिस्थितीवर मात केली. हे जीवन सुंदर आहे, असा आशावाद आपल्या कवितेतून मांडला. आकाश जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णीचा.

आमदार बच्चू कडू यांनी आकाशच्या कवितेचे स्वागत केले.

अन् ओळख झाली…

आकाश जगणे आणि जीवन याच्या सीमा पार करीत एका ठिकाणी आयुष्य कंठीत करणारा कवी आहे. त्याला त्याच्या कवितेचे पुस्तक यावे वाटायचे. त्याला कोणी तरी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुहास सदाव्रते यांच्याशी संपर्क साधायला सांगितले. त्यांनी सदाव्रते यांना व्हॉटसअॅपवर एक मेसेज पाठवला. येथूनच त्यांची ओळख झाली. आकाशची कवितेबाबतची ओढ पाहून त्यांनी त्याला पाठबळ देण्याचा निर्धार केला. अन् सुयश प्रकाशनच्या प्रकाशिका आरती सदाव्रते यांनी पुढाकार घेत आकाशचा श्वास कविता ध्यास कविता हा कवितासंग्रह आणला.

वास्तव अनुभव…

कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ रविराज नाईक यांनी अतिशय कल्पकतेने साकारले आहे. आकाशाकडे हात उंचावत आपले ध्येय साध्य झाल्याचा अत्यानंद झालेल्या युवकाच्या मनातले भाव यातून चितारले आहेत. चित्रकार संतोष जोशी,सुरेश तापडिया यांची चित्रे या पुस्तकात लक्ष वेधून घेतात. कवितासंग्रहात 94 कविता आहेत. आकाश देशमुख याच्या मनातले भावतरंग, जगण्याचे वास्तव आलेले अनुभव, आई-वडिलांचे अपार कष्ट,स्वतःचा जगण्याचा चाललेला ध्यास अशा विविध विषयांवरील कविता या संग्रहात आहेत. शेती, शेतकरी जीवन, सैनिक, कष्टकरी, सामान्य माणूस हा आकाशच्या कवितेचा विषय होतो.

साऱ्यांचा हातभार…

कवितासंग्रहात पाऊस, वेदना, बासरी, मैत्री, आषाढी वारी, तिरंगा, श्रावण महिना, वीर जवान, बालपण, देव अशा विषयांवरील कविता वास्तवाचे भान जपायला लावतात. सोबतच प्रियकर, प्रेयसी, विरह, प्रेमाच्या आणाभाका, बासरी, ओढ, अनावर आठवण अशा कविता स्वप्नांच्या दुनियेत घेवून जातात. आकाशचा कवितासंग्रह पूर्णत्वास नेण्यासाठी साने गुरुजी कथामालेच्या कल्पना दत्तात्रय हेलसकर, प्रमुख कार्यवाह आर. आर. जोशी, कार्याध्यक्ष जमीर शेख, कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, उपाध्यक्ष डॉ. दिगंबर दाते, संजय निकम, प्रा. दत्ता देशमुख, पवन कुलकर्णी, संदीप इंगोले, रामदास कुलकर्णी, डॉ. यशवंत सोनुने, कैलास गाडेकर यांनी परिश्रम घेतले.

कर्तृत्वावर विश्वास…

आकाशच्या कवितेबद्दल पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव राजगुरू म्हणतात, अभावग्रस्त माणसे आपल्या नशिबाला दोष देत रडतरखडत जगत असतात. एखाद्याच व्यक्तीचा आपल्या कर्तृत्वावर विश्वास असतो, कारण अशा व्यक्तीच जगण्यावर निरतिशय प्रेम असते. आकाश देशमुख याच प्रकारातला आहे. तर आकाशची कविता म्हणजे वेदना आणि काव्यफुलांचे लेणे असल्याची प्रतिक्रिया दिनकर सासरणे, डॉ. दिगंबर दाते यांनी व्यक्त केली.

आकाशच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ.

•••

आकाशच्या काही कविता…

•••

आसवांना बोलके करणार होतो मी वेदनेच्या आतही, मुरणार होतो मी

•••

एकटाच मी एकटेच स्वप्न माझे एकटीच वाट अन एकटीच रात्र …

•••

बाप माझा राबतो शेतात दिवस- रात्र एक करी आम्हा पोसतो हीच आमची पंढरी

•••

कृष्णा, तुझी बासरी ऐकताच राधा ही बावरते वेड्या मना ती सावरु पाहते..

•••

नाजूक गोड शब्द तिचे ती हृदयावर लिहून गेली हाताचा स्पर्श जादू जशी नकळत मनाला मोहून गेली

•••



Source link