हेमकिरण पत्की6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपलं मन जेव्हा अनुकूलतेचा अनुभव घेत असतं, तेव्हा ते सुखद संवेदनेनं भारावून गेलेलं असतं. सुखमग्न असतानाची स्थिती आपल्याला जवळच्या माणसांसोबत वाटून घ्यावी वाटते. सुखाचा स्वभाव सर्वत्र सांडणाऱ्या उजेडासारखा असतो. जेव्हा आपण या सुखाला आपल्यापुरतं अनुभवतो, त्याचा उगम जाणून घेत नाही, तेव्हा ते काळाकडून संपवलं जातं. सुखाचे क्षण काजव्यासारखे लखलखतात आणि काळजाआड होतात. खरं तर सुख नुसतं देहात्मक नसतं; ते स्नेहात्मकही असतं. असं स्नेहात्मक सुख काळजाला भरून टाकतं.
एखाद्या फुलपाखरासारखं आपण त्याला देहसंवेदनेच्या ओंजळीत धरू पाहतो. त्याचे रंग इंद्रियांवर पसरतात. फुलपाखरू अचेतन होतं. आपण घेतो त्या सुखाच्या अनुभवाचंही असंच होतं. सुखाचा अनुभव घेताना आपलं मन सुखाशी एकाकार झालेलं असतं. मनाची धाव आणि हाव सुखात लय पावलेली असते. सुखद क्षणात अवघी संवेदनाच एकवटून आलेली असते. सहजपणे वाट्याला आलेले सुखाचे क्षण आपल्याला असतेपणाशी जोडतात. या सुखाच्या घटिताबाबत आपण कित्येकदा सजग नसतो. सजगतेसह घेतलेलं सुख अविनाशी असतं. कारण या सुखाच्या अनुभवात मनाचे तर्क, विकल्प, कल्पना यांचा समावेश नसतो. स्नेहात्मक असलेलं सुख अस्तित्वापाशी, सत्यापाशी किंवा चैतन्यापाशी प्रार्थना करण्याची स्थिती निर्माण करतं. आपल्या असण्याचं अखंड भान हेच ईशस्मरण आहे, याची अनुभूती देऊ शकतं. कबीरांच्या जीवनातला प्रत्येक क्षण याच अनुभूतीनं भारलेला आहे. दुखऱ्या अनुभवातला मनाचा आशय हा संकोच पावलेला असतो. तो सर्वव्यापी चेतनेशी जोडला जाऊ शकत नाही, हे सांगताना कबीरांचे शब्द संवेदनशील हृदयाशी संवाद करतात…
सुख में सुमिरन ना किया,
दुख में किया याद,
कह कबीर ता दास की,
कौन सुने फरियाद।
या दोह्यातला कबीरांनी योजलेला ‘सुमिरन’ हा शब्द कळीचा आहे. हा शब्द ते ‘सुरत’ शब्दाशी जोडून घेतात. या अर्थपूर्ण जोडणीमुळं कबीरांच्या उपदेशाला अनुभूतीची ओल लाभते. आपल्यासारख्या सामान्य माणसांना संकटकाळीच देवाची आठवण येते. अभावानं ग्रासलेलं असताना आपलं मन देवाचा धावा करतं. त्वरेनं संकटाचं निराकरण व्हावं, यासाठी त्याच्याजवळ प्रार्थना करतं. अभाव दूर झाल्यावर त्याला विसरतं. आपल्या मनाचा हा स्वभाव कबीर जाणतात. ते म्हणतात, ‘सुखात तुला सुखकर्त्याची आठवण झाली नाही आणि आता दुःखात धावा करतोयस. ही तुझी काळजातली वेदना कोण ऐकेल!’ वाट्याला आलेल्या स्थितीला शांतपणे समजून घेऊन, जगण्याच्या इच्छेला यथार्थपणे जाणून असतेपणाशी जोडून घ्यावं, हेच कबीरांना अपेक्षित असलेलं ‘सुमिरन’ आहे.
आपण अभावग्रस्त असतो, तेव्हा मन दुःखी असतं. आपल्या मनाला दुःखामागून येणाऱ्या सुखाची चाहूल जाणवत नाही. अशावेळी देवाची आठवण कुठं जाते! देवाची आठवण म्हणजे ‘देव’ हा शब्द की त्याची मनानं साकारलेली प्रतिमा असते? आपलं ‘मी’पण, माझेपण आणि मनातल्या इच्छांचं जाळं या सगळ्यांबाबत आपण सजग असणं आवश्यक असतं. देवाची आठवण आपण मनाच्या या सजगतेला दूर ठेवून करतो, तेव्हा कबीर देवाला आठवण्याची रीत सांगतात…
सुमिरन सुरत लगाइके,
मुख ते कछु न बोल,
बाहर के पट देइकै,
अंतर के पट खोल।
देवाची आठवण संपूर्ण जागृतीतून होते, तेव्हा सुख अंतरात असतं. ते बाहेरच्या कुठल्याही वस्तूवर अवलंबून नसतं. ही जागृती म्हणजे आंतरिक स्थितीत विचलित न होता निरखणं असतं. ‘जे आहे’ त्याचं केवळ निरीक्षण असतं. मुखानं कशाचाही उच्चार न करता, दृष्टी कुठल्याही विक्षेपांनी बाहेर फाकू न देता आणि मन विकल्पांच्या ताब्यात जाऊ न देता ईश्वराचं स्मरण करायचं, असं कबीर सुचवतात.
‘सुमिरन सुरत’मधलं हे सूचन ध्यानात घेतलं, तर वृत्तीपालट शक्य आहे, असंच कबीरांना सुचवायचं आहे. बहिर्मुख दृष्टी आत वळल्यावर विशेषत्वानं करण्यासारखं काही उरत नाही. आपल्या ‘स्व’त्वाचं खरं दर्शनच आपल्याला जाणीवपूर्वक कराव्या लागणाऱ्या क्रियांपलीकडं नेतं. कर्तेपणातल्या धारणेचं फोलपण दाखवतं. कबीर म्हणतात…
माला तो कर में फिरै,
जीभ फिरै मुख माहिं,
मनुआं तो दहुदिसि फिरै,
यह तो सुमिरन नाहिं।
आपल्या मनाचं विचाराधीन होणं, विचलित-विक्षेपित होणं, शांत होण्याच्या प्रयत्नांत अशांत होणं यामुळं आपण कर्मांचा आधार घेतो. उपासनांच्या विविध रीतींचा आधार घेतो; शब्दप्रामाण्याला ज्ञान समजून चालतो. हातात माळ घेऊन जप करणं, हे असंच एक कर्म असतं. मनाचा स्वभाव भ्रमण्या-भटकण्याचा असतो. ते जपाच्या माळेतील मणी ओढूनही थाऱ्यावर राहत नाही. स्वतःत विलय पावत नाही. दाही दिशा हिंडत राहतं. हृदयात परतायची अकरावी दिशा या मनाला दिसत नाही. कबीर म्हणतात : हे ईश्वराचं अवधानपूर्वक केलेलं स्मरण नसतं. अवधानात मनाच्या स्वभावाचा अभ्यास असतो. देहापलीकडचा अस्तिभाव जाणून घ्यायची तहान असते. शरीर आणि मन मरणधर्मा असतं, म्हणूनच कबीरांना ईश्वराच्या स्मरणाचंं मोल सामान्य माणसाच्या हृदयात जागवावं वाटतं.
(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)






