Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तकामागच्या गोष्टी: कल्पनेच्या तीरावरचा विचार-विहार

पुस्तकामागच्या गोष्टी: कल्पनेच्या तीरावरचा विचार-विहार

पुस्तकामागच्या गोष्टी: कल्पनेच्या तीरावरचा विचार-विहार

[ad_1]

आदूबाळ18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मार्गारेट ॲटवूड.

मार्गारेट ॲटवूड या कॅनेडियन लेखिकेच्या कार्याने साहित्य जगतावर अमीट छाप सोडली आहे. सहसा लेखक आपल्या लेखनाचा साचा फार लवकर घडवतात. ललित लेखन, विज्ञानकथा वगैरे विधेमध्ये (Genre) स्वतःला बंदिस्त करून ठेवतात. अॅटवूड यांच्यासारखे फार कमी लेखक विधेपलीकडे जाऊन विचार करतात. तीक्ष्ण सामाजिक भाष्य करणारी अॅटवूड यांची कथानकं विचारप्रवर्तक असतात. पुष्कळदा त्यात कुनस्थानी (Dystopian) जग वर्णिलेलं असतं. त्यासाठी त्यांचे लेखन ओळखले जात असले, तरी या पलीकडे मानवी स्वभाव, सत्ताकारण आणि सामाजिक संरचनांच्या गुंतागुंतीचा ते शोध घेतं.

अॅटवूड यांचा जन्म १९३९ ला कॅनडामध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना भाषेविषयी प्रेम निर्माण झालं आणि कथांच्या ताकदीची ओळख पटली. करियर म्हणून याच आवडीला पुढे नेत त्यांनी टोरंटो विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि रॅडक्लिफ कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली. अॅटवूड यांची साहित्यिक जडणघडण याच काळातली आहे आणि पुढच्या विपुल लेखनाचा पायाही याच सुमारास घातला गेला.

अॅटवूड या अष्टपैलू लेखिका आहेत – कविता, कथा आणि वाङ्मयीन टीका या तिन्ही क्षेत्रांत त्या तितक्याच ताकदीने वावरल्या. आज त्यांना प्रसिद्धी आणि मुख्य ओळख मिळाली आहे, ती भविष्यवेधी कथा लिहिण्याबद्दल. भविष्यातलं जग कसं असू शकेल, याबद्दल कल्पना करून लिहिणे अशा स्वरूपाच्या कथांना इंग्रजीत Speculative Fiction म्हटलं जातं. जॉर्ज ऑर्वेलची १९८४ ही कादंबरी अशा प्रकारच्या लेखनाचा उत्तम आणि सुप्रसिद्ध नमुना आहे. मराठीत कुसुमाग्रजांची ‘कल्पनेच्या तीरावर’ आणि नंदा खरेंची ‘उद्या’ ही त्याची दमदार उदाहरणं म्हणता येतील. अशा लेखनाने अॅटवूडना वाचकांचं प्रेम आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली आहे. ‘द हँडमेड्स टेल’ या १९८५ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीत, भविष्यातल्या एका देवभोळ्या समाजात महिलांचे अधिकार कठोरपणे दडपले जातात. स्त्रियांची भूमिका केवळ ‘प्रजनन करणारी यंत्रणा’ म्हणून सीमित ठेवली जाते. ‘चूल आणि मूल’ बस्स! दमनशाही एकचालकानुवर्ती राजकीय व्यवस्था आणि धार्मिक मूलतत्त्ववाद हे स्वातंत्र्यावर कशाप्रकारे गदा आणू शकतात, याचा ही कादंबरी शोध घेते. नुकतीच ‘द हँडमेड्स टेल’ची दूरचित्रवाणी मालिका आली आणि त्यामुळे ही अजरामर कादंबरी नव्या पिढीपर्यंत पोहोचली. गमतीचा भाग असा की, १९८५ मध्ये लिहिलेली ही कादंबरी २०२० मध्येही तितकीच, किंबहुना जास्तच लागू आहे, असं लक्षात आलं. आत्मसंतुष्टता, धार्मिक मूलतत्त्ववाद आणि दमनशाही राज्यव्यवस्था व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच कसा करू शकतात, याविषयीच्या महत्त्वपूर्ण चर्चेला या मालिकेने तोंड फोडलं.

अॅटवूड यांची प्रसिद्धी ‘द हँडमेड्स टेल’बद्दल असली, तरी त्यांच्या डिस्टोपियन लेखन भांडारात असलेली एक उल्लेखनीय बाब म्हणजे ‘मॅडअॅडम’ कादंबरीत्रयी. ‘ओरिक्स अँड क्रेक’ (२००३), ‘द इयर ऑफ द फ्लड’ (२००९) आणि ‘मॅडअॅडम’ (२०१३) या मालिकेत अॅटवूड पर्यावरणीय समस्या, जनुक अभियांत्रिकी (Genetic Engineering) यांना अनियंत्रित कॉर्पोरेट शक्तीची जोड मिळाल्यावर काय अनर्थ घडेल, याचं चित्र उभं करतात. अॅटवूड यांच्या लेखनाबाबत सतत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे त्यांनी रंगवलेलं काल्पनिक भविष्य शक्यतेच्या कोटीतलं वाटत राहतं. एका मुलाखतीत त्या म्हणतात, ‘माझ्या कादंबरीतल्या कोणत्याही घटना पूर्ण काल्पनिक नसतात – कुठेतरी त्यांना वर्तमानाशी जोडणारं बीज असतं आणि माझं काम त्या घटनांचा पूर्ण विकास झाल्यावर जग कसं दिसेल, हे वाचकांसमोर ठेवायचं असतं.’ कोणतीही कृती परिणामशून्य नसते. वर्तमानात केलेल्या / घडलेल्या कृतींचे भविष्यकालीन जगावर होणारे परिणाम विचारात घेण्यास अॅटवूड वाचकांना उद्युक्त करतात. अॅटवुड फक्त या विषयांवर कथा लिहून थांबत नाहीत, तर त्याविषयी सामाजिक बांधिलकीही बाळगतात. त्या अभिव्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क आणि पर्यावरण संवर्धनाबाबत कृतींतूनही आग्रही असल्याचं दिसतं.

भविष्यवेधी कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांच्या मांदियाळीत अॅटवुड उठून दिसतात. प्रभावी गद्यलेखन हा त्यातला एक भाग. त्यांच्या कथा बहुपेडी असतात आणि अनेक स्तरांतून उलगडत जातात. त्यांची पात्रं जटिल आणि म्हणून मानवी असतात. पात्रांच्या आणि त्यांच्या भोवतालाच्या चित्रणात ठोकळेबाजपणा नसतो. वाचक त्या कथांमध्ये आणि पात्रांमध्ये गुंतून पडतो. अॅटवूड यांचं लेखन वादळात सापडलेल्या नौकेच्या होकायंत्रासारखं आहे. ते गुंतागुंतीच्या मानवी अनुभवांतून निर्माण होणाऱ्या समस्यांतून मार्गदर्शन करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे, या प्रवासात आपण घेत असलेल्या निर्णयांच्या परिणामांबद्दल आपल्याला सजग करतं.

आदूबाळ
aadubaal@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments