
प्रवीण दशरथ बांदेकर15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
फेसबुकवरून ओळख झालेला एक शिक्षक मित्र म्हणाला, ‘मी फार अस्वस्थ आहे मणिपूरच्या त्या घटनेचं कळल्यापासून. राहून राहून मला त्या स्त्रियांच्या जागी माझीच लेक, माझी आई, बहीण दिसतेय. भयंकर सुरू आहे आपल्या देशात. माणसं इतकी कशी सैतान बनल्यासारखी वागू लागलीत, कळत नाहीय..’
मित्र म्हणत होता त्यात काहीच चुकीचं नव्हतं. मित्रच कशाला, त्या घटनेमुळं सगळा देशच अस्वस्थ झाला होता. विचार करणाऱ्या आणि संवेदनशील असलेल्या कुणाही माणसाला धक्का बसेल, अशीच ती घटना होती. देशाचे सर्वेसर्वा असलेले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असलेले बुद्धिजीवी वगैरे फारसे काही प्रतिक्रियादाखल बोलत नसले, तरी सर्वसामान्य माणसं मात्र फेसबुक, व्हाट्स ॲप वगैरेंसारख्या उपलब्ध समाजमाध्यमांना हाताशी धरून व्यक्त होत होती. फेसबुकवरचा माझा मित्रही सतत याविषयी काहीबाही लिहीत आपली अस्वस्थता व्यक्त करत होता. मराठी कवी-लेखक-कलावंत वगैरे अशा घटनांबाबत उदासीन असतात, व्यवस्थेच्या विरोधात जाण्याऐवजी आपल्या लाभस्थानात व्यवस्थेतले राहू-केतूसारखे ग्रह अनुकूल कसे होतील, याचाच ते विचार करत असतात, असा या मित्राचा आरोप होता. यात काही फार चुकीचं होतं, असंही नाही. मराठीच नव्हे, तर काही अपवाद वगळता देशभरातील बहुतांश कवी, लेखक, कलावंत आणि शिक्षक-प्राध्यापकांसारखे पांढरपेशा बुद्धिजीवी लोक आजकाल साधी प्रतिक्रिया नोंदवायलाही मागेपुढे पाहतात, असंच जाणवत असतं. एरवी आपल्या सुरक्षाकवचाच्या आतल्या अन्य कोणत्याही विषयावर मते मांडायला मात्र हे लोक हिरीरीने पुढं असतात.
तशातच शिक्षकांच्या एका व्हाट्स ॲप ग्रुपवरची एक चर्चा वाचनात आली. तिथेही हा शिक्षक मित्र ॲक्टिव्ह होता. मणिपूर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील काही मंडळी एका कृती-कार्यक्रमाची आखणी करीत होते. शालेय शिक्षणमंत्री आमच्याच जिल्ह्यातले असल्याने त्यांनाही सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करणारं एक निवेदन द्यावं, असंही ठरत होतं. आमच्या त्या ग्रुपमधल्या काही शिक्षकांनाही ते योग्य वाटत होतं. पण, अशा निषेध कार्यक्रमांनी काय होणार आहे, नेहमी चमकोगिरी करून कागदी प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे असलेले लोकच यासाठी उतावीळ झालेत, असं अन्य काही शिक्षकांचं म्हणणं होतं. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या त्या ग्रुपवरच्या बाकी सदस्यांविषयी मी समजू शकत होतो. त्यातले बहुसंख्य निव्वळ पोटार्थी शिक्षक होते. पगार, कुटुंब, नोकरीतल्या पाट्या टाकणं, चंगळवादी स्वरूपाची मौजमजा यापरते विश्व नसलेली, कसलेही सामाजिक भान नसलेली ही मंडळी होती. त्यांच्या अशा प्रतिक्रिया येणार, हे मी गृहीतच धरले होते. आश्चर्य वाटावं असं त्यात काही नव्हतं. पण, या चर्चेत शिक्षणमंत्र्यांना ओढू नये, त्यांचा काय संबंध आहे, असं माझ्या या फेसबुकी शिक्षक मित्रानं मांडलेलं मत वाचल्यावर मात्र मला धक्काच बसला. काही महिन्यांमागे कोबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झालेला राज्य शासनाचा पुरस्कार शासनाकडूनच मागे घेण्यात आला होता, तेव्हाही या शिक्षक मित्राने शासनाची बाजू कशी बरोबरच आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, ते आठवलं. खरं तर, तेव्हा या पुस्तकावर कोणत्याही प्रकारची बंदी वगैरे काही नव्हती. तरीही केवळ नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका कार्यकर्त्याने आपले अनुभव यात मांडलेले असल्याने शासनाने हा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामागेही या आमच्या शिक्षक मित्रासारख्या काही तथाकथित समाजहितचिंतक लोकांचा दबाव होता, हेही नंतर समोर आले होते. वास्तविक हा निर्णय लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाराच होता. याचा निषेध म्हणून, त्यासोबतच शासकीय पुरस्कार जाहीर झालेल्या काही अन्य लेखकांनीही आपापले पुरस्कार परत केले होते. पण, आधी पुरस्कारासाठी अर्ज करणारे नि आता पुरस्कार परत करणारे हे लोक कसे ढोंगी आहेत, यावरून या मित्राने आमच्याशी वाद घातला होता. म्हणजे कवी-लेखक किंवा शिक्षक-पत्रकारांसारखे बुद्धिजीवी लोक भूमिका घ्यायला कचरतात, व्यवस्थेच्या विरोधात कृती करायला घाबरतात, असेही एकीकडे म्हणायचे आणि कुणी काही भूमिका घेतली, कृतिशील झाला, तरीS त्याला प्रसिद्धीसाठी हे सगळं करतायत म्हणून ट्रोलिंग करत टोचा मारायच्या, असा हा सरळ सरळ दुटप्पीपणा होता.
मला वाटतं, या फेसबुकी विद्वान शिक्षक मित्रासारखे अनेक जण आपल्या अवतीभवती आहेत. एकीकडे ते तुमच्यासोबत वावरताना आपण कसे समाजाप्रति संवेदनशील, जाणीव असलेले आहोत, सर्वसामान्य माणसांचं अस्तित्व संपवू पाहणाऱ्या मुर्दाड व्यवस्थेची आपल्याला कशी चीड आहे, असंच सतत सांगत असतात. पण, त्याच शोषित, पीडित समाज घटकांसाठी काही करू या म्हटलं की हे बिळात लपून राहतात. तिथून कुत्सितपणे तुमच्यावर फूत्कार सोडत नाउमेद करत राहतात. सत्तेतील सरकारच्या विरोधात तर कधी ‘ब्र’सुद्धा काढण्याची तसदी हे लोक घेत नाहीत. तुम्ही तसं करू पाहिलात, तर या त्या मार्गांनी तुमचंही खच्चीकरण करण्याच्या संधी ते शोधत राहतात. अशा आमच्या मित्रांचं हे परस्परविरोधी वर्तन पाहताना मला अनेकदा डॉ. जेकील ॲण्ड मिस्टर हाईड आठवतात. खरं तर, ही एकाच व्यक्तिमत्त्वाची दुभंगलेली प्रतिरूपे. पण, आपल्यातल्या या विसंगतीपूर्ण वर्तनव्यवहाराची जाणीवही नसलेली. आपल्या सोयीप्रमाणे कधी डॉ. जेकीलच्या सज्जन, परोपकारी आणि जगाविषयी दयार्द्र नजरेने पाहणारी, तर कधी मिस्टर जॅकीलच्या पराकोटीच्या हिंसक आणि आतल्या गाठीच्या स्वार्थी वृत्तीने भवतीच्या जगाला वेठीस धरू पाहणारी.
डॉ. हेन्री जेकील आणि मिस्टर एडवर्ड हाईड म्हणजे रॉबर्ट लुईस स्टिव्हनसन्सच्या ‘स्ट्रेंज केस ऑफ डॉ. जेकील ॲण्ड मिस्टर हाईड’ या बहुचर्चित कादंबरीतल्या नायकाची दोन रूपं. काही कारणांनी दुभंगलेलं नायकाचं व्यक्तिमत्व (Split Personality) आणि त्याचं परस्परविरोधी वर्तन किंवा बुचकळ्यात टाकणारी वागण्यातली विसंगती एकवेळ समजून घेता येऊ शकते. याचं कारण म्हणजे, मुळात डॉ. जॅकील ही व्यक्ती अतिशय सद्वर्तनी, समंजस आणि जगाच्या भल्याचा विचार करणारी, समाजाचा आदरभाव मिळवून असलेली अशीच असते. वैज्ञानिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या बुद्धिमान डॉ. जॅकीलला विज्ञानाची काळी बाजूही जगासमोर आणायची असते. त्यासाठीच स्वतःवरच काही गंभीर प्रयोग करून तो आपल्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या मिस्टर हाईड या सैतानाला बाहेर काढतो. पुढे घडत गेलेल्या गोष्टींवर त्याचं नियंत्रण राहत नाही, त्यातून अनेक भल्याबुऱ्या बाबी जगासमोर येतात वगैरे.. हे आपण समजू शकतो.
आपल्याही व्यक्तिमत्त्वाला असे असंख्य सूक्ष्म कंगोरे असू शकतात. आपल्या आत दुसऱ्याच्या दुःखानं कळवळणारा एखादा मातृहृदयी श्याम असू शकतो, तसाच ‘टू बी ऑर नॉट टू बी’ म्हणत निर्णय घ्यायला कचरणारा डेन्मार्कचा राजपुत्र हॅम्लेटही असू शकतो. वासनांवर नियंत्रण नसलेला ययाति असू शकतो तसा प्रियतमेच्या विरहानं तळमळणारा शापित यक्षही असू शकतो. पण, या सगळ्यांना नियंत्रणात ठेवत स्वतंत्र बुद्धी, प्रज्ञा आणि आपली अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ‘ओळख’ (Identity) असलेलं माणूसपण जपणं आपल्याच हातात असतं. आजकाल आपण नेमकं हेच विसरत चाललो आहोत की काय, असंच राहून राहून वाटतं. आपल्या आत दडून असलेल्या बाकी सगळ्या भल्याबुऱ्या रूपांना डावलून निव्वळ चिमूटभर स्वार्थासाठी आपल्यातल्या सैतानालाच आपल्यावर हावी होण्याची दुर्बुद्धी आपल्याला सुचली असेल, तर त्याला कोण काय करणार? चित्ती नाही अनुताप, लटिके भगवे स्वरूप.. असं वर्तन असलेल्या आमच्या त्या फेसबुकपंडित मित्रासारख्यांसाठीच तुकोबांनी इशारा देऊन ठेवला असावा काय.. तुका म्हणे सिंदळीच्या, व्यर्थ श्रमविसी वाचा?
samwadpravin@gmail.com






