Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुस्तकामागच्या गोष्टी: काळामागे पडलेला ‘भारतीय-इंग्लिश’ लेखक

पुस्तकामागच्या गोष्टी: काळामागे पडलेला ‘भारतीय-इंग्लिश’ लेखक

पुस्तकामागच्या गोष्टी: काळामागे पडलेला ‘भारतीय-इंग्लिश’ लेखक

[ad_1]

  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Story Sadar Of Pustakamaagchy Ghoshti Write By Aadubal 

आदूबाळ5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

रुड्यार्ड किप्लिंग

काही इंग्रजीत लिहिणारे अभारतीय लेखक त्यांच्या मूळ देशापेक्षा भारतातच जास्त प्रसिद्धी राखून असतात. पी. जी. वूडहाऊस, जेफ्री आर्चर ही त्यातली काही नावं. रुड्यार्ड किप्लिंग हे नाव त्यातच धरायला हवं. ‘जंगल बुक’ या कार्टून मालिकेमुळे किप्लिंग यांचा परिचय भारतातल्या मुलांना बऱ्यापैकी लहानपणी होतो. या पुस्तकाचा मूळ लेखक या नात्याने त्यांची इतर पुस्तकं वाचायला अनेक जण प्रेरित होतात. या दरम्यान कधीतरी किप्लिंग यांचा भारताशी असलेला घनिष्ठ संबंध कळतो आणि त्यांच्याबाबत आणखीच आपुलकी वाटायला लागते. पण, इंग्लंडमध्ये मात्र त्यांना अभिमानास्पद लेखकांच्या मांदियाळीत गणलं जात नाही. का ते पाहूया…

किप्लिंग यांचा जन्म १८६५ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकलेचे अध्यापक होते. (किप्लिंग यांचा जन्म झाला, ते घर आजही नीलफलक धारण करून आहे.) किप्लिंग परिवार स्वतःला अँग्लो-इंडियन समजे – म्हणजे भारताशी घनिष्ठ संबंध राखणारे इंग्रज. किप्लिंगचं भारतप्रेम आणि दोन्ही संस्कृतींशी असलेला प्रेमळ संबंध याने त्यांच्या लेखनावर अत्यंत प्रभाव टाकला. तत्कालीन अँग्लो-इंडियन मध्यमवर्गीय परंपरेप्रमाणे आई-वडिलांनी त्यांना इंग्लंडमध्ये शिकायला धाडलं. किप्लिंगना इंग्लंड अजिबात मानवलं नाही. त्यांचा अर्धा जीव भारतात अडकला होता. कसेबसे धक्के खात शेवटी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी लाहोरच्या इंग्रजी दैनिकात उपसंपादकाची नोकरी धरली. मुंबईचा किनारा पाहिल्यावर त्यांना हायसं वाटलं. “त्या क्षणानंतर,” ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “माझा ‘इंग्लिश काळ’ कायमचा संपला.” त्यानंतर पुढच्या आयुष्यात इंग्लंडला परतले तरी त्यांनी आपल्या मनात भारताविषयीचा एक तुकडा कायम जिवंत ठेवला.

आज आपल्याला दिसतात ते किप्लिंग लाहोरच्या दैनिकातील नोकरीमुळे घडले. संपादक बदलत राहिले, पण त्यांनी किप्लिंग यांना संपूर्ण लेखनस्वातंत्र्य दिलं होतं. पोटापाण्याची चिंता न राहिल्याने संपूर्ण ताकद लेखनात ओतणं आता त्यांना शक्य झालं. लवकरच फौजी आयुष्यावर लिहिलेल्या विनोदी चारोळ्यांचा संग्रह ‘डिपार्टमेंटल डिटीज’ प्रकाशित झाला. त्यानंतर आपलं लेखन वाचणार कोण, हा प्रश्न त्यांना कधीच पडला नाही. लघुकथा, दीर्घकथा आणि शेवटी कादंबऱ्या – त्यांचा वाचकवर्ग वर्धिष्णू होत राहिला. ‘जंगल बुक’ हे १८९४ मध्ये लिहिलेलं पुस्तक हा वस्तुतः लघुकथांचा संग्रह आहे. त्याची लोकप्रियता पाहता त्यांनी या पुस्तकाचा दुसरा भाग लगोलग १८९५ मध्ये प्रकाशित केला. ‘किम’ ही माझी स्वतःची अत्यंत आवडती कादंबरी १९०१ मध्ये प्रकाशित झाली. किंबॉल ओहारा (उर्फ किम) या एका आयरिश सैनिकाच्या अनाथ मुलाची कहाणी त्यात आहे. या चलाख मुलाला शिक्षण देऊन रशिया-इंग्लंड यांच्यातील राजनैतिक हेरगिरीच्या खेळात ओढलं जातं, पण एका तिबेटी लामाच्या मैत्रीमुळे किमचा प्रवास अध्यात्म मार्गावर सुरू राहतो. कथावस्तू, पात्र, आणि तत्कालीन भारताची निसर्गवर्णने यामुळे ही कादंबरी अत्यंत वाचनीय झाली आहे.

एक काळ असा होता की, किप्लिंग यांची लोकप्रियता इंग्लंडमध्येही अमाप होती. १९०७ मध्ये त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण, वसाहतवादाच्या अंतानंतर किप्लिंग यांची मते लोकांना टोचायला लागली. त्यांचं भारतावरचं प्रेम एकीकडे, पण वसाहतवाद त्यांच्या लेखनात अंतःप्रवाहासारखा वाहतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे, ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ ही त्यांची कविता, ज्यात वसाहतवादाचं उघड उघड समर्थन आहे. इतकंच नाही तर ‘गरीब बिचाऱ्या मागास लोकांच्या आयुष्याचं कोटकल्याण करणे ही गोऱ्या लोकांची जबाबदारी आहे,’ असं प्रतिपादन ते करतात.

हेच ते ‘गोऱ्या कातडीचं ओझं’! यामुळे वसाहतीकरणाच्या कृत्याला एकाएकी तात्त्विक बैठक मिळाली. त्यांच्या लेखनाचं आज वाचन करता इतरही अडचणीच्या गोष्टी जाणवतात. त्यांची पात्रं विशिष्ट पूर्वग्रहांना खतपाणी घालतात. पण तरीही, किप्लिंग वर्णद्वेष्टे होते असं म्हणवत नाही. लेखनात पूर्वग्रह असले, तरी ते दोन्ही बाजूंनी आहेत. उदा. सुप्रसिद्ध ‘गंगादिन’ या कवितेतला गंगादिन युद्धभूमीवरचा भिस्ती असतो. कवितेचा निवेदक, एक गोरा सोजीर, गंगादिनला हिडीसफिडीस करतो, वाईट वागवतो. पण ऐन लढाईत जखमी निवेदकाला गंगादिन स्वतःच्या जीवावर खेळून वाचवतो आणि शेवटी निवेदक गंगादिनची थोरवी मान्य करतो. (पूर्वग्रह टाळून ललित लेखन करणं ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत किप्लिंग यांचा दयाबुद्धीने विचार करावा, अशी वाचकांना विनंती!)

वसाहतीकरणाच्या अंतानंतर जेव्हा मनातूनही वसाहतवाद नष्ट करण्याची चळवळ पाश्चात्त्य जगात सुरू झाली, तेव्हा आपोआप किप्लिंग जुनाट, कालबाह्य वाटू लागले. ते नि:संशयपणे आपल्या काळाचं अपत्य होते, पण काळच त्यांना मागे टाकून पुढे गेला.

—-

आदूबाळ
aadubaal@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments