उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा उपक्रम
फलटण | प्रतिनिधी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध शासकीय व प्रशासकीय विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. धन्यकुमार गोडसे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी गोडसे साहेब यांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा भक्कम आधार असून प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांचा आदर करून ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच संविधानाची ओळख करून घेतली पाहिजे आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी संविधानिक मूल्यांची जपणूक केली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या कार्यक्रमास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. बल्लाळ साहेब, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सुबनावळ साहेब, नायब तहसीलदार मा. श्री. अभिजीत सोनवणे साहेब, फलटण नगरपरिषदेचे बांधकाम अधिकारी मा. श्री. गायकवाड साहेब, माजी जिल्हा कृषी अधीक्षक मा. श्री. जितेंद्र शिंदे (जि.प.) साहेब उपस्थित होते.
तसेच फलटण नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक मा. श्री. सचिन सर अहिवळे, दुर्बल घटक योजना सभापती तथा नगरसेविका सौ. सुपर्णाताई अहिवळे, नगरसेविका सौ. मीनाताई काकडे, नगरसेविका सौ. लोढेताई, नगरसेविका सौ. बेंद्रेताई यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शासकीय व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
