आई-वडिलांच्या कष्टांचे चीज; विडणीच्या कन्येने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर
विडणी (ता. फलटण) : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द, मेहनतीची तयारी आणि ध्येयाप्रती प्रामाणिकपणा असेल तर यश मिळवता येते, हे विडणी (जगतापवस्ती) येथील कु. काजल अर्जुन जगताप हिने सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत तिची मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या काजलच्या या यशाचे विडणीसह फलटण तालुक्यात कौतुक होत आहे.
काजलच्या यशामागे तिच्या आई-वडिलांचा संघर्ष आणि तिची जिद्द यांचा मोठा वाटा आहे. तिचे वडील गवंडीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई मोलमजुरी करून संसाराला हातभार लावते. रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरू असतानाही मुलीने शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हेच आई-वडिलांचे स्वप्न होते. आर्थिक अडचणींची जाणीव असलेल्या काजलनेही परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीला प्राधान्य दिले.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काजलने स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले. विडणी ग्रामपंचायतीच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेत नियमित अभ्यास करून तिने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. अनेक अडचणी, मर्यादित आर्थिक साधने आणि आव्हानात्मक परिस्थिती असतानाही तिने अभ्यासातील सातत्य कायम राखले. विविध स्पर्धा परीक्षांचा अनुभव घेत अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिला यश मिळाले आणि मंत्रालय सहाय्यकपदी निवड होण्याचे स्वप्न साकार झाले.
काजलचे यश हे केवळ एका विद्यार्थिनीचे वैयक्तिक यश नाही, तर कष्टकरी कुटुंबातील मुलांमध्येही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता असते, याचे जिवंत उदाहरण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपले ध्येय गाठावे, असा प्रेरणादायी संदेश तिच्या यशातून मिळत आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या शिक्षणासाठी कष्ट उपसणाऱ्या आई-वडिलांच्या त्यागाचेही या यशामुळे सार्थक झाले आहे.
काजलच्या या यशाबद्दल मंत्रालयाचे अवर सचिव धीरज अभंग, विडणीचे सरपंच सागर अभंग, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा पुणे व सातारा जिल्हा प्रभारी आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी व माजी अध्यक्ष महावीर भालेराव, माजी सरचिटणीस बाबासाहेब जगताप, माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, माजी संस्कार उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, माजी संघटक तथा बंधू आनंद जगताप, माजी संघटक अमोल काकडे, माजी प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी संस्कार सचिव अमोल भोसले, सचिन जगताप, सूरज जगताप, गौरव जगताप, दत्ता अब्दागिरे, दत्ता नाळे तसेच संगम मित्र तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय विडणी व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थांनीही काजलचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
