Friday, October 30, 2026
Homeसातारादहिवडीत मॉल साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता!

दहिवडीत मॉल साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता!

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आगीचा भडका; स्थानिक तरुण, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात

दहिवडी | साहस Times :- दहिवडी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मॉलसाठी लागणारे रॅक, फर्निचर तसेच अन्य साहित्य होलसेल दरात पुरवणाऱ्या एका गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. लालसरे यांच्या मालकीच्या या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने गोडाऊनमधील साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगीच्या धुराचे लोट; परिसरात एकच खळबळ

गोडाऊनमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता पाहता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर मॉलसाठी लागणारे रॅक आणि इतर साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने वेगाने पेट घेतल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्थानिक तरुण आणि पोलिसांचे धाडस; अग्निशमन दलाची मदत

आगीची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले.

आगीची तीव्रता लक्षात घेता म्हसवड आणि वडूज येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही ठिकाणांहून दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल यांच्या समन्वयामुळे आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

या सर्वांच्या सतर्कतेमुळे आग आसपासच्या परिसरात पसरण्याचा संभाव्य धोका टळला. मात्र, गोडाऊनमधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असण्याची शक्यता असून, नुकसानीचा अधिकृत आकडा पंचनामा व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दहिवडीतील अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

या घटनेने दहिवडी शहरातील आपत्कालीन व्यवस्थेतील महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहरात एखादी मोठी आग लागल्यास तातडीने अग्निशमन दल उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, अशा प्रसंगी म्हसवड किंवा वडूज येथून अग्निशमन वाहन येण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे सुरुवातीचा महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दहिवडी शहराचा वाढता विस्तार, व्यापारी आस्थापनांची संख्या, गोदामे, दुकाने आणि बाजारपेठेतील वाढती वर्दळ लक्षात घेता नगरपालिकेकडे स्वतःचे अग्निशमन वाहन असणे ही आता केवळ सुविधा न राहता काळाची गरज बनली आहे.

नागरिकांची मागणी : दहिवडी नगरपालिकेने अग्निशमन वाहन उपलब्ध करावे!

शहरात भविष्यात अशा दुर्घटना घडल्यास जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी दहिवडी नगरपालिकेने तातडीने स्वतःचे अग्निशमन वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

केवळ अग्निशमन वाहन खरेदी करून प्रश्न सुटणार नाही, तर प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक पाण्याची व्यवस्था, अग्निसुरक्षा उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणाही सक्षम करणे गरजेचे आहे. तसेच शहरातील व्यापारी संकुले, गोडाऊन आणि मोठ्या आस्थापनांची अग्निसुरक्षा तपासणी नियमितपणे व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

आगीची घटना घडल्यानंतर मदतीसाठी धावपळ करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच सक्षम यंत्रणा उभारणे महत्त्वाचे आहे. दहिवडीतील या घटनेतून नगरपालिकेने आणि संबंधित प्रशासनाने योग्य तो धडा घेऊन अग्निशमन सुविधेचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments