Wednesday, October 21, 2026
Homeसातारा"धम्माचा मार्ग म्हणजे समता, शिक्षण आणि मानवतेचा मार्ग” — आयु. विठ्ठल निकाळजे

“धम्माचा मार्ग म्हणजे समता, शिक्षण आणि मानवतेचा मार्ग” — आयु. विठ्ठल निकाळजे

भीम सागर तरुण मंडळाच्या वतीने भोळी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी उत्साहात साजरी

भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा | दि. २० ऑक्टोबर २०२६ : भीम सागर तरुण मंडळ, भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर होते.

यावेळी आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोका विजयादशमी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचीन भारताची संस्कृती, इतिहास आणि सम्राट अशोक यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण परिवर्तन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. कलिंग युद्धातील भीषण रक्तपातानंतर सम्राट अशोकाच्या जीवनात झालेला वैचारिक बदल आणि त्यांनी स्वीकारलेला धम्ममार्ग हा मानवतेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली धम्मदीक्षा ही भारतीय सामाजिक इतिहासातील क्रांतिकारी घटना असल्याचे सांगत, तिच्यामागील सामाजिक व वैचारिक भूमिका त्यांनी स्पष्ट केली. धम्म म्हणजे विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि माणुसकीची शिकवण असून ती आपल्या आचरणातून पुढे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आजच्या काळात समाजाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांना शिक्षण देणे, त्यांच्यामध्ये चिकित्सक विचार निर्माण करणे आणि त्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी केले. बाबासाहेबांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आत्मसात करून पुढील पिढी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा शाखा खंडाळा तालुका प्रचार व पर्यटन प्रमुख आयु. युवराज खुंटे, आयु. शरद खुंटे, सामाजिक कार्यकर्ते आयु. विजय खुंटे, तसेच अमर खुंटे, प्रविण खुंटे, साहिल सोनवणे, सतिश खुंटे, सुनिल खुंटे, जितेंद्र खुंटे, प्रथमेश खुंटे यांच्यासह भीम सागर तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माता रमाई महिला मंडळाच्या सर्व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच भोळी गावातील उपासक-उपासिका आणि धम्मप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून इतिहासाची जाणीव, धम्माची मूल्ये, समतेचा विचार आणि शिक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.

सविनय जयभीम! नमोबुद्धाय!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments