Tuesday, October 20, 2026
Homeफलटणश्रद्धेचे धन असणारा माणूस कधीच गरीब नसतो!

श्रद्धेचे धन असणारा माणूस कधीच गरीब नसतो!

समता नगर (विडणी) येथे वर्षावास प्रवचन मालिकेत सोमीनाथ घोरपडे यांचे प्रतिपादन

विडणी : आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत समता नगर (विडणी) येथे सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेअंतर्गत न्यू पंचशील तरुण मित्र मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्तपणे ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ या अभियानात भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी ‘श्रद्धा हेच सर्वश्रेष्ठ धन’ या विषयावर मार्गदर्शन केले.

तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आलवक यक्ष यांच्यात झालेल्या संवादाचा संदर्भ देत घोरपडे यांनी सांगितले की, आलवक यक्षाने तथागतांना विचारलेल्या चार प्रश्नांपैकी पहिला प्रश्न होता -‘जगातील सर्वश्रेष्ठ धन कोणते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना तथागतांनी ‘श्रद्धा हेच सर्वश्रेष्ठ धन आहे’ असा संदेश दिला. श्रद्धा म्हणजे केवळ एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे नव्हे, तर त्या श्रद्धेनुसार आचरण करण्याचे धैर्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या प्रवचनात त्यांनी या विचाराचे महत्त्व दोन कथांच्या माध्यमातून उलगडून सांगितले. पहिल्या कथेत अत्यंत गरीब पती-पत्नीपैकी पतीकडे पांघरायला असलेली एकमेव जुनी, फाटकी शाल तो तथागतांना अर्पण करतो. शाल देताना त्याच्या मनात स्वतःच्या गरिबीची आणि थंडीची चिंता असली, तरी अखेरीस तो मोहावर विजय मिळवतो. शाल अर्पण केल्यानंतर तो ‘मी जिंकलो!’ असे उद्गारतो. त्यावेळी युद्ध जिंकून आलेला राजा त्याला विचारतो की, त्याने कोणता विजय मिळवला. त्यावर तो आपल्या मनातील लोभ-मोहावर मिळवलेल्या विजयाचे वर्णन करतो.

या कथेतून बाह्य शत्रूवर मिळविलेला विजय आणि स्वतःच्या मनावर मिळविलेला विजय यातील फरक स्पष्ट होत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले. राजाने त्याच्या श्रद्धा, त्याग आणि दानशीलतेने प्रभावित होऊन त्याला शाली तसेच पुढे संपत्ती दिल्याचा कथाभागही त्यांनी स्पष्ट केला.

दुसऱ्या कथेद्वारे श्रद्धा ही परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जाण्याचे अंतर्बळ देते, हा विचार त्यांनी मांडला. श्रद्धेच्या बळावर माणूस लोभ, मोह, कंजूषपणा आणि असमाधान यांवर मात करून दानशीलता, करुणा, समाधान आणि प्रसन्नता जोपासू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

बाबासाहेबांच्या जीवनातील बुद्धधम्माचे स्थान

प्रवचनाच्या सुरुवातीस सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात तथागत भगवान गौतम बुद्ध कसे आले आणि त्यांच्या विचारप्रवासात बुद्धधम्माचे स्थान कसे दृढ होत गेले, याची मांडणी केली. बाबासाहेबांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातही बुद्धविचाराला केंद्रस्थानी ठेवत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे झालेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा संदर्भ देत त्यांनी नागपूरची निवड का करण्यात आली, यामागील सामाजिक, ऐतिहासिक आणि चळवळीच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले. बाबासाहेबांच्या धर्मांतराकडे केवळ धार्मिक घटना म्हणून न पाहता मानवी प्रतिष्ठा, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांचा स्वीकार करणारी ऐतिहासिक सामाजिक क्रांती म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रद्धेचे धन माणसाला अंधानुकरणाकडे नव्हे, तर विचारपूर्वक आचरणाकडे घेऊन जाते. भौतिक संपत्तीचे स्वरूप बदलते; मात्र सद्विचारांवरील श्रद्धेतून निर्माण होणारी दानशीलता, करुणा आणि समाधान ही माणसाची खरी संपत्ती ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

उपासक-उपासिकांची मोठी उपस्थिती

आजच्या प्रवचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा विधी संचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी पदाधिकारी तथा बौद्धाचार्य आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांचीही यावेळी आवर्जून उपस्थिती होती.

कार्यक्रमास न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, बौद्ध उपासक-उपासिका तसेच बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून बुद्धविचार, धम्मतत्त्वे आणि सामाजिक समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू असून, ‘दर रविवारी चला बुद्ध विहारी’ अभियानाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments