Sunday, October 18, 2026
Homeफलटणआढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

आढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

आढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

BSI मिशन २५ अंतर्गत २२ सैनिकांना सैनिकी प्रशिक्षण; परेड, ड्रिल, सलामीसह विविध शिस्तीचे प्रशिक्षण

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सातारा (पूर्व) यांच्या वतीने BSI मिशन २५ अंतर्गत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी आढाववस्ती (गुणवरे), ता. फलटण येथे उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये केंद्रीय शिक्षक आयु. संपत भोसले (मेजर, SSD) आणि आयुनि. अर्चना चव्हाण (कंपनी कमांडर, समता फोर्स, SSD) यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.

समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्ष २०२७ पर्यंत प्रत्येक तालुका व शहर शाखेत २,००० प्रशिक्षित सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट BSI मिशन २५ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी किमान ५६ ठिकाणी ५६ सैनिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन असून, प्रत्येक रविवारी संबंधित शाखेच्या कार्यक्षेत्रातील मैदानावर अथवा बुद्धविहारासमोर सैनिकांची साप्ताहिक परेड घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या व्यापक उपक्रमासाठी समता सैनिक दलाचे प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभा आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (BSI)चे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर तसेच ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.

परेड व सैनिकी शिस्तीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण

शिबिरामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना समता सैनिक दलाच्या सैनिकी शिस्तीचा भाग म्हणून परेडचे नियम व पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्यामध्ये लाईन तोड पद्धत, ड्रिल पद्धत, सलामी पद्धत, विसर्जन पद्धत, सावधान, विश्रांती/विसाव, संचलन, वळणे, रांगेतील शिस्त, आदेशानुसार हालचाल, पावलांची चाल, ध्वजवंदन तसेच परेडमधील विविध घटकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व सराव करून घेण्यात आला.

प्रशिक्षणादरम्यान केवळ शारीरिक कवायत आणि परेडवर भर न देता आदेशाचे पालन, वेळेचे भान, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.

समतेच्या विचारांसाठी प्रशिक्षित सैनिकांची फळी

समता सैनिक दलाच्या माध्यमातून समता, बंधुता, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजूट या मूल्यांची जोपासना करणे, कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रशिक्षित सैनिकांची सक्षम फळी उभी करणे, हा या प्रशिक्षण उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

या प्रशिक्षण शिबिरात २२ सैनिकांनी समता सैनिक दलाचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये फलटण तालुक्यातील शुभम सिद्धार्थ अहिवळे, विश्वभूषण अरविंद आढाव, सिद्धार्थ धनाजी आढाव, बुद्धभूषण अरविंद आढाव, अरविंद बाबुराव आढाव, बबन वालचंद आढाव, तानाजी भगवान सावंत, आनंद राहुल आढाव, अमोल ज्ञानदेव आढाव, राहुल गौतम आढाव, किशोर मारुती आढाव, मधुकर मेथा आढाव, राजेंद्र भीमराव बनसोडे, जय विजय बनसोडे, झुंबर वालचंद आढाव, सिद्धांत दीपक आढाव, स्वानंद राजेंद्र बनसोडे, राजेंद्र भीमराव बनसोडे आणि अमोल शत्रुघ्न भोसले यांचा समावेश आहे. बारामती तालुक्यातून प्राशु प्रमोद कांबळे, वैशाली प्रमोद कांबळे, प्रमोद पोपट कांबळे, पोपट महादेव कांबळे यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

या प्रशिक्षणामुळे आढाववस्ती परिसरात समता सैनिक दलाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत झाली असून, आगामी काळात नियमित साप्ताहिक परेड आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना समता सैनिक दलाशी जोडण्याचा संकल्प करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments