फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; हिंदुत्ववादी संघटनेचे पोलिसांना निवेदन
फलटण : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भीती निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याच्या कथित प्रकाराचा फलटणमधील हिंदुत्ववादी संघटनेने तीव्र निषेध केला. या गंभीर प्रकरणातील संशयितावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण शहर पोलिसांना निवेदन दिले.
अल्पवयीन मुलीला जादूटोण्याच्या नावाखाली घाबरवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, तसेच पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
