मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला फलटणमध्ये राजकीय बळ; ‘लढणार आणि जिंकणारच’ असा चिवटे यांचा निर्धार
फलटण : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित विजय संकल्प सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना वेग आला.
यावेळी मंगेश चिवटे यांच्याशी संवाद साधताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीतील उमेदवारीच्या राजकारणावर भाष्य केले. “महायुतीमध्ये राज्यपातळीवर आपले ऐकले गेले नाही किंवा दिलेला शब्द पाळला गेला नाही, तर अपक्ष म्हणून लढा. फलटणचा डीएनएच अपक्ष लढण्याचा आहे. त्यामुळे काळजी करू नका,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत रामराजे नाईक निंबाळकर यांनी १९९६ मधील राजकीय परिस्थितीची आठवण करून दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगेश चिवटे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत फलटणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही चिवटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा दर्शविला. “एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता माघार घेण्याचा प्रश्न नाही. निवडूनच यायचे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
मंगेश चिवटे यांच्या सामाजिक व जनसेवेच्या कार्याचा उल्लेख करत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले. सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची भूमिका हीच त्यांच्या उमेदवारीची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे येथे मंत्री, खासदार व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर फलटणमध्ये झालेल्या विजय संकल्प सभेतून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरही पाठिंबा असल्याचा राजकीय संदेश देण्यात आला.
यावेळी मंगेश चिवटे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. “मी लढणार आणि जिंकणारच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या सभेला फलटण तालुक्यातील शिक्षक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबत फलटणमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
