Tuesday, October 6, 2026
Homeफलटणमुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

फलटण : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा, तणावमुक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे प्रभावी विचारपीठ म्हणजे युवा महोत्सव होय, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा मंगळवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. उद्घाटन समारंभात प्रा. डॉ. ज्योती जाधव बोलत होत्या.

आजच्या स्पर्धात्मक युगात महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यास, करिअर, गुणप्राप्ती, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, आंतरविद्याशाखीय विषयांची विविधता आणि रोजगाराच्या संधी यामुळे विविध प्रकारच्या तणावाला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत कला, संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, अभिनय, वक्तृत्व आणि साहित्य यांसारख्या कलाप्रकारांमध्ये सहभागी होणे विद्यार्थ्यांच्या मानसिक आनंदासोबतच त्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला बळ देते, असे प्रा. डॉ. जाधव यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी प्रास्ताविकातून युवा महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या या सांस्कृतिक व्यासपीठाचे महत्त्व अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत होते, असे सांगितले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कला, संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी संधी मिळणे आवश्यक आहे. मुधोजी महाविद्यालयात मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन होणे ही फलटणसह महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

या युवा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३३६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित महोत्सवात संगीत, समूहगीत, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय व सुगम गायन, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, मूकनाट्य, नक्कल, पथनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, लघुपट, छायाचित्रण, रांगोळी, मेहंदी, मातीकाम, कागदकाम, व्यंगचित्र, स्थळचित्रण आणि सर्जनशील लेखन अशा विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थी आपली प्रतिभा सादर करत आहेत.

युवा महोत्सवामुळे मुधोजी महाविद्यालयाचा परिसर सध्या युवा ऊर्जा, कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेने भारावून गेला आहे. विविध महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारामुळे फलटणमध्ये चार दिवसांचा सांस्कृतिक उत्सव रंगला आहे.

कार्यक्रमास प्रा. डॉ. सुरेखा आडके, डॉ. आर. एच. अतिग्रे, डॉ. देवानंद सोनटक्के तसेच शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, अशोक जोशी, संजय भोसले, नितीन शेठ गांधी, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, शकील सय्यद, नितीन शांतीलाल गांधी, प्रा. सी. डी. पाटील तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.

मध्यवर्ती युवा महोत्सवाचे समन्वयक प्रो. डॉ. टी. पी. शिंदे यांनी आभार मानले. मान्यवरांची नामावली प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी वाचली. प्रा. संग्राम निंबाळकर आणि प्रा. निलम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध समित्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments