Sunday, September 27, 2026
Homeफलटण“ बुद्ध विचारांची पूजा नव्हे, आचरणाची गरज : सोमीनाथ घोरपडे”

“ बुद्ध विचारांची पूजा नव्हे, आचरणाची गरज : सोमीनाथ घोरपडे”

“ बुद्ध विचारांची पूजा नव्हे, आचरणाची गरज : सोमीनाथ घोरपडे”

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त तक्षशिला बुद्ध विहार विडणी येथे धम्मप्रबोधन

फलटण : भगवान बुद्धांचा सदाचार, करुणा आणि नैतिकतेचा मार्ग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे काटेकोरपणे आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी केले.
विडणी येथील तक्षशिला बुद्ध विहारात संघमित्र तरुण मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्तपणे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदना व धम्मप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध धम्म वर्षावास व वर्षावास सुसंस्कार पर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमात घोरपडे बोलत होते.

घोरपडे म्हणाले, कोणत्याही प्राण्याची हत्या न करणे, कोणालाही शारीरिक अथवा मानसिक दुःख न देणे, चोरी न करणे, स्वेच्छेने दिलेले तेवढेच स्वीकारणे, नैतिक आचरण करणे आणि असत्याचा त्याग करून सत्याचा मार्ग स्वीकारणे, ही सदाचाराची मूलभूत तत्त्वे आहेत. या तत्त्वांचे आचरण केल्याने व्यक्तीचे जीवन सुसंस्कृत होते आणि समाजात शांतता, सुरक्षितता व परस्पर विश्वास निर्माण होण्यास मदत होते.

समाजात चोरी, खून, अत्याचार यांसारख्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत भगवान बुद्धांचा सदाचार, करुणा आणि नैतिकतेचा विचार समाजजीवनात रुजविण्याची गरज आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. समाजाला घातक ठरणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा करणारे आचरण व विचार टाळून प्रत्येकाने सदाचाराचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व
यावेळी घोरपडे यांनी भाद्रपद पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व स्पष्ट केले. तथागत गौतम बुद्धांच्या सावत्र माता महाप्रजापती गौतमी यांच्यासह यशोधरा आणि पाचशे राजघराण्यातील स्त्रियांचा भिक्षुणी संघात प्रवेश, कोसलनरेश प्रसेनजित यांना तथागत बुद्धांनी केलेला धम्मोपदेश, तसेच पारिलेय्यक वनातील तथागत बुद्धांच्या वास्तव्यादरम्यान हत्तीने केलेली सेवा आणि माकडाने बुद्धांना अर्पण केलेल्या मधाचा प्रसंग यांचा त्यांनी उल्लेख केला.
माकडाने तथागत बुद्धांना मध अर्पण केल्याच्या प्रसंगामुळे भाद्रपद पौर्णिमेला ‘मधु पौर्णिमा’ म्हणूनही ओळखले जाते. या प्रसंगातून दान, करुणा, मैत्री आणि सर्व जीवांप्रती सद्भावनेचा संदेश मिळतो, असे घोरपडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांवर श्रद्धा ठेवण्याबरोबरच ते आपल्या दैनंदिन जीवनात काटेकोरपणे आचरणात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.

विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
यावेळी संघमित्र तरुण मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या तसेच नव्याने नियुक्त झालेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत सदस्य तथा मंडळाचे प्रवर्तक कैलास जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधिर विद्यालय, सातारा येथून सुरेश सुदाम जगताप सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विनया सचिन जगताप यांची जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
बारामती नगरपालिकेच्या लेखा विभागात अतुल राहुल मोरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच राहुल बाबुराव मोरे हे बारामती नगरपालिकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी येथून उपमुख्याध्यापक म्हणून मामू काशिनाथ जगताप सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुरेश जगताप, विनया सचिन जगताप आणि मामू जगताप यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कैलास जगताप यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. अभिजीत जगताप यांनीही सत्कारमूर्तींच्या कार्याशी संबंधित आठवणी सांगितल्या.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष तथा समाजप्रबोधनकार बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव, माजी सरचिटणीस तथा वक्ते आयु. बाबासाहेब जगताप, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. रामचंद्र मोरे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विधीचे संचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस तथा वक्ते आयु. बाबासाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच उपस्थितांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments