प्राचीन वास्तू व शिल्पांचे संरक्षण करण्यासाठी २०० मीटर परिसरात ध्वनिवर्धकांवर निर्बंध; पारंपरिक वाद्यांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन
फलटण | प्रतिनिधी :फलटण शहरातील ऐतिहासिक व पुरातन श्री जब्रेश्वर मंदिराच्या वास्तूचे तसेच प्राचीन शिल्पांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने गणेशोत्सव काळात मंदिर परिसरात डीजे व लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६ अन्वये याबाबत आदेश जारी केला आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. २० ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री जब्रेश्वर मंदिराच्या २०० मीटर परिसरात गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान ध्वनिवर्धक, डीजे व लाऊडस्पीकर वाजविण्यास पूर्ण बंदी राहणार आहे.
मोदी बिल्डिंग ते टोपी चौक मार्गावर निर्बंध
हा आदेश गजानन चौकातील मोदी बिल्डिंग ते टोपी चौक या मिरवणूक मार्गावर लागू करण्यात आला आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे अथवा इतर ध्वनिवर्धकांचा वापर केल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी व कंपनांमुळे मंदिराच्या पुरातन वास्तू तसेच प्राचीन शिल्पांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.
ASI व पोलिसांच्या पत्रानंतर प्रशासनाचा निर्णय
या संदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) तसेच फलटण शहर पोलिसांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पुरातन वास्तूच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी संबंधित मार्गावर ध्वनिवर्धकांच्या वापरावर निर्बंध घालण्याचा आदेश दिला आहे.
पारंपरिक वाद्यांचा मर्यादित आवाजात वापर
गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर मर्यादित आवाजात करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान मंदिर परिसरात अनावश्यक गर्दी किंवा वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये आणि मिरवणूक थांबवून न ठेवता नियोजित मार्गाने पुढे न्यावी, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
फलटण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या श्री जब्रेश्वर मंदिराच्या पुरातन वास्तूचे संरक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी असून, गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
