Thursday, September 17, 2026
Homeफलटणधम्मविचारातून समाजप्रबोधनाची गरज - संजय घोरपडे सर

धम्मविचारातून समाजप्रबोधनाची गरज – संजय घोरपडे सर

धम्मविचारातून समाजप्रबोधनाची गरज – संजय घोरपडे सर
जाधववाडी, ता. फलटण : माता यशोधरा महिला संस्कार वर्गाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जाधववाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे करण्यात आले. या कार्यक्रमास माता यशोधरा महिला संस्कार वर्गातील उपासक, उपासिका, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित कांताताई काकडे यांनी माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, संघर्ष, संयम आणि बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यामागील त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. रमाईंच्या जीवनातून कुटुंब, समाज आणि परिवर्तनाच्या कार्याप्रती असलेली निष्ठा शिकण्यासारखी आहे, असे त्यांनी सांगितले.

“धम्म हा केवळ आचरणाचा विषय नसून जीवन जगण्याची दिशा आहे” – संजय घोरपडे सर
कार्यक्रमात आयु. संजय घोरपडे सर यांनी धम्माचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बुद्धांच्या धम्मातील प्रज्ञा, करुणा, समता, मैत्री आणि सदाचार ही मूल्ये दैनंदिन जीवनात रुजविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. धम्माचा अभ्यास केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या विचारांत, वर्तनात आणि सामाजिक जीवनात प्रतिबिंबित झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचे महत्त्व सांगताना वाचन, चिंतन आणि आचरण यांच्या माध्यमातून धम्मविचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. समाजात समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये दृढ करण्यासाठी धम्मविचार प्रभावी माध्यम ठरू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

आयु. चंद्रकांत मोहिते सर, केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील त्याग, संघर्ष आणि संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या धम्मचळवळीला पुढे नेण्यासाठी भैय्यासाहेबांनी केलेले योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्मकार्य, संघटन आणि समाजप्रबोधनाची जबाबदारी पार पाडणे ही प्रत्येक धम्मबांधवाची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भैय्यासाहेबांच्या कार्याची आठवण ठेवणे म्हणजे केवळ अभिवादन करणे नव्हे, तर त्यांनी जपलेल्या धम्मकार्याची आणि सामाजिक बांधिलकीची वाट पुढे नेणे होय, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माता यशोधरा महिला संस्कार वर्गाच्या माध्यमातून महिला, माता-भगिनी आणि उपासक-उपासिका यांच्यामध्ये धम्मसंस्कार, वाचन, प्रबोधन आणि सामाजिक एकजूट वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास जाधववाडी परिसरातील माता यशोधरा महिला संस्कार वर्गाचे उपासक, उपासिका, माता-भगिनी तसेच धम्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती बौद्धाचार्य आयु. संजय घोरपडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे उपस्थित होत्या. यावेळी सुभाष मारुती काकडे, रजनी सुभाष काकडे, सुनंदा किशोर काकडे, कुमुदिनी गौतम रणदिवे, जिजा विजय कंकाळ, आशा भगवान गायकवाड, अनिता अमर गायकवाड, शारदा जयसिंग घाडगे उपस्थित होते. यावेळी आयुनि सुभाष मारुती काकडे व आयुनि रजनी मारुती काकडे यांनी उपस्थितांना अल्पोहार व फलहार देण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments