Thursday, September 17, 2026
Homeसातारासातारा जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे

सातारा जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिरे

नवीन नाव नोंदणी, दुरुस्ती व नाव वगळण्यासाठी नागरिकांना संधी; सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत BLO राहणार उपस्थित

सातारा | प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी ही शिबिरे घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावरही विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ ची प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये विविध कारणांमुळे काही पात्र मतदारांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव नोंदवून घेण्याची संधी दावे व हरकतींच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

नवमतदारांनाही नोंदणीची संधी

१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी तसेच प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांनी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये आवश्यक दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

BLO मतदान केंद्रावर उपस्थित

विशेष शिबिरांच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी प्रथम मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव नसल्यास नवीन नोंदणी, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विशेष शिबिरात सादर करावा.

मतदार यादीत पात्र नागरिकांचे नाव राहावे आणि कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने SIR-2026 साठी नाव शोधण्याची सुविधा तसेच दावे-हरकती आणि मार्गदर्शक माहिती उपलब्ध करून दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments