Tuesday, September 8, 2026
HomeUncategorizedअनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध; फलटणमध्ये १० सप्टेंबर रोजी विराट संविधान समर्थन मोर्चा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध; फलटणमध्ये १० सप्टेंबर रोजी विराट संविधान समर्थन मोर्चा

एस.सी. प्रवर्गातील ५९ जातींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

फलटण : अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील अ, ब, क व ड या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी फलटण येथे गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून फलटणचे प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून, एस.सी. प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील ५९ जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजातील विविध घटक जातींमध्ये फूट पडून त्याचा सर्वांनाच मोठा फटका बसण्याची भीती मोर्चा समितीच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.

उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणाचे तुकडे होऊन शिक्षण, नोकरी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या संधींवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका उपस्थित समाजबांधवांनी मांडली. शिक्षण घेणारे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणारे युवक-युवती आणि भविष्यातील पिढीला या निर्णयाचे परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.

समाजाच्या आरक्षणाच्या हक्कावर परिणाम होऊ नये आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटक समाजांमध्ये एकता कायम राहावी, यासाठी वेळेत जागृत होऊन उपवर्गीकरणाला विरोध करणे आवश्यक असल्याचे मोर्चा समितीने म्हटले आहे. त्यामुळे एस.सी. प्रवर्गातील महिला, पुरुष, युवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अनुसूचित जातीतील विविध घटक जाती समूहांच्या प्रमुखांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ येथे पार पडली. या बैठकीत विविध समाजांच्या प्रतिनिधींनी उपवर्गीकरण विरोधी मोर्चामध्ये आपापल्या समाजाचा ताकदीने सहभाग नोंदविण्याचा निर्धार एकमताने व्यक्त केला.

या बैठकीस बौद्ध, चर्मकार, हिंदू खाटीक, बुरुड, हिंदू ढोर, होलार तसेच वाल्मिकी-मेहतर-रुखी समाजासह विविध अनुसूचित जाती घटक समाजांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने उपवर्गीकरणाला विरोध करण्याची भूमिका मांडली.

मोर्चाची माहिती

मोर्चाचे नाव : संविधान समर्थन उपवर्गीकरण विरोधी मोर्चा
दिनांक : गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १०.३० वाजता
मार्ग : मंगळवार पेठ समाज मंदिर येथून बारामती चौक मार्गे प्रांत कार्यालय, फलटण
आयोजक : संविधान समर्थन मोर्चा समिती, फलटण

मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास विरोध दर्शवून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे एस.सी. प्रवर्गातील सर्व ५९ जातींतील समाजबांधवांनी आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments