पर्यावरण संवर्धनाचा विचार जपत कालकथित उत्तम विठ्ठलराव घोरपडे यांचे अस्थिसंकलन व पुण्यानुमोदन विधी संपन्न
फलटण : आज शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी सासकल येथे कालकथित उत्तम विठ्ठलराव घोरपडे यांच्या अस्थिसंकलन व पुण्यानुमोदन विधीचा कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात विधिवतरीत्या संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धनाचा विचार जपत अस्थींचे नदी अथवा जलाशयात विसर्जन न करता वृक्षाच्या सान्निध्यात जमिनीत विसर्जन करून त्यावर नारळाचे रोप लावण्यात आले. अस्थी पाण्यात प्रवाहित केल्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळून, मृत्यूनंतर पंचस्कंधांपैकी पृथ्वीधातूचे शरीरातील अस्थी व इतर धातू पुन्हा मातीमध्ये विलीन व्हावेत, या भावनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम करण्यात आला.
अस्थींचे जमिनीत विसर्जन करून त्याच ठिकाणी नारळाचे झाड लावण्यात आल्याने, दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपत निसर्ग संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात हा विधी पार पाडताना जीवनाची अनित्यता आणि मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते यांची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली.
या प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्ट उपस्थित होते. त्यामध्ये कालकथित उत्तम विठ्ठलराव घोरपडे यांचे चिरंजीव आयु. किशोर उत्तम घोरपडे, त्यांच्या मुली पल्लवी, दीपिका व रुपाली, पत्नी मंगल उत्तम घोरपडे, तसेच त्यांचे बंधू मधुकर घोरपडे, रवींद्र घोरपडे, जालिंदर घोरपडे, माजी प्राचार्य आयु. अर्जुन घोरपडे, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयु. लक्ष्मणराव निकाळजे आणि बौद्धाचार्य आयु. संजय प्रल्हाद घोरपडे यांची उपस्थिती होती.
अस्थिसंकलन व पुण्यानुमोदन विधी भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आयु. संजय प्रल्हाद घोरपडे व समता सैनिक दलाचे माजी पदाधिकारी आयु. लक्ष्मणराव निकाळजे यांनी पार पाडला.
यावेळी आयु. लक्ष्मणराव निकाळजे, आनंदराव निकाळजे, जावई आयु. विठ्ठल काकडे आणि बौद्धाचार्य संजय घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म, अनित्यता, पर्यावरण संवर्धन तसेच कालकथित उत्तम विठ्ठलराव घोरपडे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
तथागत बुद्धांनी सांगितलेल्या ‘अनिच्चा’ (अनित्यता) या जीवनसत्याचे स्मरण ठेवून दुःखावर मात करत धम्ममार्गाने पुढे जाणे, विवेकपूर्ण व सदाचारी जीवन जगणे आणि समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे, हाच दिवंगत व्यक्तीच्या स्मृतींना खरा आदर ठरतो.
कालकथित उत्तम विठ्ठलराव घोरपडे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
भवतु सब्ब मंगलं।
सब्बे सत्ता सुखी होन्तु।
