फलटणमध्ये ‘एससी’ प्रवर्गातील ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात जाहीर आव्हान
फलटण प्रतिनिधी : अनुसूचित जाती अर्थात शेड्युल कास्ट (SC) प्रवर्गातील विविध समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत तीव्र भूमिका मांडण्यासाठी फलटण येथे SC प्रवर्गातील ५८ जातींच्या माध्यमातून भव्य महामोर्चा आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
‘चलो फलटण, चलो फलटण’ अशी जाहीर हाक देत या महामोर्चामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, SC प्रवर्गातील आरक्षणाचे वर्गीकरण झाल्यास विविध समाजांमध्ये मतभेद आणि फूट निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा दीर्घकालीन परिणाम सामाजिक एकतेवर होऊ शकतो. अनुसूचित जातींसाठी असलेले आरक्षण हे या प्रवर्गातील सर्व समाजांना एकत्र बांधून ठेवणारे महत्त्वाचे माध्यम असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
५८ समाजांना एकत्र घेऊन मोर्चाची तयारी
फलटण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रस्तावित महामोर्चासाठी SC प्रवर्गातील तब्बल ५८ समाजांच्या प्रतिनिधींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत विविध समाजांचे प्रतिनिधी, समाजसेवक आणि प्रमुख बांधव यांच्यासोबत बैठक घेऊन मोर्चाची तारीख, मार्ग आणि पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आरक्षणाच्या वर्गीकरणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एकात्मतेला धक्का बसू शकतो, अशी भीती व्यक्त करत समाजबांधवांनी कोणत्याही प्रकारच्या मतभेदांना बळी न पडता एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
या महामोर्चामध्ये SC प्रवर्गातील सर्व समाजांचे प्रतिनिधी आणि बांधव यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच SC प्रवर्गातील ५८ समाजांमधील समाजसेवक, कार्यकर्ते व प्रतिनिधींनी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात पुढाकार घेऊन संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मोर्चाची अंतिम तारीख आणि नियोजन लवकरच सर्व समाजांच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येणार असून, फलटणमध्ये मोठ्या प्रमाणावर हा महामोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
