Monday, August 31, 2026
Homeफलटणसिगालो सुत्तातून आदर्श गृहस्थ जीवनाचा मार्ग’ - आयु. बजरंग गायकवाड

सिगालो सुत्तातून आदर्श गृहस्थ जीवनाचा मार्ग’ – आयु. बजरंग गायकवाड

‘सिगालो सुत्तातून आदर्श गृहस्थ जीवनाचा मार्ग’ – आयु. बजरंग गायकवाड

पवारवाडी येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील प्रथम पुष्प उत्साहात संपन्न

फलटण : “भगवान बुद्धांनी सिगालो सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनातील नैतिक मूल्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक संबंध आणि कर्तव्यभावनेचा अत्यंत सुंदर मार्ग दाखवून दिला आहे. धम्म केवळ ऐकायचा नसून तो आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणायचा आहे,” असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी संस्कार सचिव तथा बौद्धाचार्य आयु. बजरंग गायकवाड सर यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका माजी कार्यकारिणी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, पवारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील पवारवाडी येथील प्रथम पुष्प उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी ‘सिगालो सुत्त’ या विषयावर प्रवचन करताना आयु. बजरंग गायकवाड सर बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पूर्व शाखेचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ पोपट घोरपडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कार्यकारिणी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर होते. यावेळी माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, माजी संघटक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक आयु. राजेंद्रकुमार गायकवाड सर व छाया गायकवाड मॅडम, तसेच माजी संस्कार सचिव आयुष्यमान अमोल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयु. महावीर भालेराव सर यांनी वर्षावासाची संकल्पना स्पष्ट केली. बौद्ध धम्माच्या प्रसार-प्रबोधनामध्ये वर्षावासाचे असलेले महत्त्व त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे विधी संचलन आयु. रामचंद्र मोरे सर यांनी केले.

प्रवचनामध्ये आयु. बजरंग गायकवाड सर यांनी सिगालो सुत्तातील प्रसंग अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले. सिगालोने केलेली सहा दिशांची पूजा आणि तथागत भगवान बुद्धांनी त्या सहा दिशांचा सांगितलेला वास्तविक अर्थ यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. आई-वडील, शिक्षक, पती-पत्नी व कुटुंब, मित्र-सहकारी, सेवक-कर्मचारी आणि धम्ममार्गदर्शक यांच्याशी असलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या म्हणजेच सहा दिशांची खरी पूजा, असा संदेश त्यांनी दिला.

सिगालो सुत्त हे केवळ प्राचीन काळातील गृहस्थांसाठीचे मार्गदर्शन नसून आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही त्याचे महत्त्व तितकेच असल्याचे गायकवाड सरांनी स्पष्ट केले. आज आर्थिक प्रगतीच्या स्पर्धेत माणूस पुढे जात असताना नातेसंबंध, कुटुंबातील संवाद, वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी, शिक्षकांविषयी कृतज्ञता, मित्रांमधील विश्वास आणि कामगारांप्रती माणुसकी या मूल्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या मांडणीला दैनंदिन जीवनातील समर्पक उदाहरणांची तसेच प्रसंगानुरूप गीतांची जोड मिळाल्याने प्रवचन अधिक प्रभावी व रसाळ झाले. सिगालो सुत्तातील धम्मविचार त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडून सांगितल्यामुळे उपस्थितांना विषय सहजपणे समजला. प्रवचनादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“दिशांना हात जोडण्यापेक्षा त्या दिशांमध्ये असलेल्या माणसांशी न्याय करणे, नात्यांचा सन्मान करणे आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे हीच भगवान बुद्धांनी सांगितलेली सहा दिशांची खरी पूजा आहे,” हा संदेश या प्रवचनातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माजी कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित धम्मबांधव-भगिनी यांनी विशेष सहकार्य केले.

‘धम्म समजून घेऊया, धम्म आचरणात आणूया आणि समाजात रुजवूया’ या मंगल भावनेने सुरू झालेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या पुढील कार्यक्रमांकडे धम्मबांधव-भगिनींचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments