वेतन, आयकर कपात आणि कर्मचाऱ्यांच्या अशासकीय कपातीच्या रकमेत फेरफार केल्याचा आरोप; तपासात आणखी कोण-कोणाचे धागेदोरे समोर येणार?
फलटण : फलटण पंचायत समितीअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ सहाय्यकाने शासकीय पदाचा गैरवापर करून तब्बल 35 लाख 32 हजार 441 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी राजू नुरमहमद पठाण (रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) याला न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
या प्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, फलटणचे उपअभियंता अशोक महादेव कोकरे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पठाण हे जून 2023 ते 25 मार्च 2026 या कालावधीत ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, फलटण येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे काढण्याचे काम त्यांच्याकडे होते. या कालावधीत त्यांनी पदाचा गैरवापर करून अनधिकृत पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
वेतनाच्या रकमेत 21.70 लाखांचा अपहार
फिर्यादीनुसार, जून 2023 ते मार्च 2026 या कालावधीत सेवार्थ प्रणालीचा वापर करून बेसिक एरियर्स आणि अतिरिक्त वेतन या शीर्षकाखाली नियमबाह्य रक्कम स्वतःच्या वेतनात समाविष्ट करण्यात आली. अशा प्रकारे 21 लाख 70 हजार 815 रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केल्याचा आरोप आहे.
तसेच जुलै 2025 मध्ये वेतनवाढ लागू नसतानाही नियमबाह्य वेतनवाढ घेऊन त्यातून आर्थिक लाभ घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
टँकरच्या आयकर कपातीच्या रकमेत 10.41 लाखांचा अपहार
टंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या देयकातून शासनाकडे जमा करावयाच्या आयकर कपातीच्या रकमेतही गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
कार्यालयाच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून दोन धनादेशांच्या माध्यमातून 1 लाख 37 हजार 288 रुपये आणि 9 लाख 4 हजार 118 रुपये, अशी एकूण 10 लाख 41 हजार 406 रुपयांची रक्कम स्वतःच्या एसबीआय खात्यात वळविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हा व्यवहार लपविण्यासाठी कार्यालयाच्या धनादेश पुस्तकाच्या काउंटर स्लिपवर ‘आयकर टँकर’ अशी खोटी नोंद करून कार्यालयीन दस्तऐवजांमध्ये फेरफार केल्याचाही आरोप आहे.
कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या 3.20 लाखांवरही डल्ला
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सोसायटी, बँक कर्ज आणि भारतीय आयुर्विमा महामंडळासाठी दरमहा कपात होणारी रक्कम संबंधित संस्थांकडे जमा करण्याचे कामही आरोपीकडे होते.
जून 2023 ते मार्च 2026 या कालावधीत 3 लाख 20 हजार 220 रुपयांची रक्कम संबंधित संस्थांना न पाठवता स्वतःच्या एसबीआय खात्यात वळवून अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून सह्या घेतल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, आरोपीने सेवार्थ प्रणालीतून कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांच्या प्रती काढून त्यातील वेतनाच्या आकड्यांमध्ये फेरफार केला. त्यानंतर या बनावट प्रतींवर तत्कालीन उपअभियंत्यांच्या सह्या घेऊन त्या पंचायत समितीच्या सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांकडे पडताळणीसाठी सादर केल्याचा आरोप आहे.
देयकांच्या प्रती जतन करणे हे कामाचा भाग असतानाही त्या प्रती नष्ट केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नातेवाईकांच्या माध्यमातून 10.34 लाख रुपये खात्यात जमा?
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपीने शासकीय निधीचा अपहार केल्यानंतर नातेवाईकांच्या माध्यमातून 10 लाख 34 हजार 349 रुपये कार्यालयाच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात वेळोवेळी जमा केल्याचे तपासात आढळल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यामुळे या पैशांच्या व्यवहारामागे नेमके कोण होते, नातेवाईकांच्या खात्यांचा वापर का करण्यात आला आणि या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिस तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता ‘बडे मासे’ कोण?
या प्रकरणात एका कर्मचाऱ्यावर थेट 35 लाखांहून अधिक रकमेच्या अपहाराचा आरोप असल्याने शासकीय कार्यालयातील आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणाऱ्या तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासली जाणार का? तसेच बनावट वेतन देयकांवर सह्या, पडताळणी आणि आर्थिक व्यवहारांच्या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग होता का, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, राजू नुरमहमद पठाण यांना यापूर्वी अटक करण्यात आली असून, तपासासाठी न्यायालयाने त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती आहे. या कोठडीदरम्यान पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी कोणते धक्कादायक आर्थिक व्यवहार आणि कोण-कोणाचे धागेदोरे समोर येतात, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.
टीप : वरील आरोप हे पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार आहेत. प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.
