बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आयोजित करण्यात येणारा ‘बारामती गणेश फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांनी दिली.
अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामतीकरांच्या सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून ‘बारामती गणेश फेस्टिव्हल’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या फेस्टिव्हलमध्ये कीर्तन, नाटक, तसेच मराठी आणि हिंदी गीतांच्या कार्यक्रमांसह विविध मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात बारामतीकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्याची संधी या फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळत होती. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनामुळे यंदा संपूर्ण बारामतीकर शोकाकुल असल्याने उत्सवी कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा नटराज नाट्य कला मंडळात केवळ साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून कोणतेही भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असे किरण गुजर यांनी स्पष्ट केले.
अजितदादांनी सुरू केलेल्या या सांस्कृतिक उपक्रमाला यंदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या भावनेतून विराम देण्यात आला आहे.
