मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मुधोजी महाविद्यालयात शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले — एक युगपुरुष’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या IQAC अंतर्गत प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी तसेच तिन्ही भाषा वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रो. डॉ. प्रभाकर पवार, प्रो. डॉ. संजय दीक्षित, प्रो. डॉ. नितीन धवडे आणि प्रो. डॉ. हणमंत पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख व्याख्याते विद्या प्रतिष्ठान, बारामतीचे मा. प्रा. डॉ. राजकुमार कदम म्हणाले, “प्राचार्य शिवाजीराव भोसले हे केवळ विख्यात वक्ते आणि विचारवंत नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संतत्वाचे दर्शन घडत होते. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीला साजेसे त्यांचे आचरण होते.”
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाची महती सांगताना डॉ. कदम म्हणाले, “फलटण ही वक्तृत्वाची पंढरी आणि त्या पंढरीतील पांडुरंग म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले,” अशी भावना आजही महाराष्ट्रातील लहान-थोर व्यक्ती व्यक्त करतात. फलटण-पुणे येथील वसंत व्याख्यानमालेपासून ते कॅलिफोर्निया आणि शिकागोपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप उमटवली. तब्बल पाच दशके त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या वाणीला करुणेचा स्पर्श होता. त्यांच्या वक्तृत्वात विचार, संवेदना आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ होता. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम म्हणाले की, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे विख्यात वक्ते तर होतेच; परंतु मुधोजी महाविद्यालयाचे तब्बल पंचवीस वर्षे प्राचार्य म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. त्या काळातील विद्यार्थी तसेच समाजातील सर्वच घटकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त धाक होता. त्यामागे त्यांचे नीतीसंपन्न, चारित्र्यवान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते.
ते पुढे म्हणाले की, प्राचार्य भोसले यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त आणि नैतिकतेमुळे मोठमोठे कार्यक्रम, गॅदरिंग यांसारखे उपक्रम ते कोणत्याही अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताशिवाय यशस्वीपणे हाताळत असत. विद्यार्थीही त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देत. त्यांनी तब्बल अर्धशतक अवघ्या मराठी मनावर संस्कार करण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांना आपल्या जीवनातील दीपस्तंभ मानून विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येकाने वाटचाल केली, तर निश्चितच व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. संजय दीक्षित यांनी करून दिला. प्रबोधिनीचे चेअरमन प्रो. डॉ. नवनाथ रासकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीता जगताप आणि प्रा. शैला क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
