फलटण पालखी मार्गावरील पथदिवा प्रकरणाला गंभीर वळण; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा PWDला कडक इशारा

0
2
फलटण पालखी मार्गावरील पथदिवा प्रकरणाला गंभीर वळण; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचा PWDला कडक इशारा

निकृष्ट कामांमुळे घडलेल्या दुर्घटनांनंतर पालिकेची कठोर भूमिका; तांत्रिक अहवालाशिवाय पथदिवे ताब्यात घेण्यास नकार, ठेकेदारावर BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण | प्रतिनिधी : फलटण शहरातील पालखी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD – विद्युत विभाग) माध्यमातून सुरू असलेल्या पथदिवा उभारणीच्या कामांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे पोल कोसळून एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना तसेच एसटी स्टँडसमोर विजेचा धक्का लागून एका मुक्या प्राण्याचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या घटनांची तातडीने दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), सातारा यांना कठोर शब्दांत नोटीस देत तातडीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पालिकेने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, पालखी मार्गावरील सर्व पथदिव्यांचे काँक्रीट फाउंडेशन तांत्रिक निकषांनुसार सुरक्षित, दर्जेदार व नियमबद्ध पद्धतीने पुन्हा करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यासोबतच, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व पथदिवे सुरक्षित असून ते तांत्रिकदृष्ट्या निकषांनुसार उभारण्यात आल्याचा अधिकृत लेखी अहवाल सादर केल्याशिवाय फलटण नगरपालिका संबंधित पथदिव्यांचा ताबा (हँडओव्हर) स्वीकारणार नसल्याची स्पष्ट भूमिका नगरपालिकेने घेतली आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), सातारा यांच्याकडे केली आहे.

तसेच, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सुरक्षेशी संबंधित तांत्रिक अहवाल २४ तासांच्या आत नगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांच्यावर राहील, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय देशपांडे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विद्युत विभागाला दर्जेदार कामे करण्याचे, तसेच पूर्ण झालेल्या सर्व कामांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे लेखी आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पालखी मार्गावरील पथदिवा कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्येही सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.