फलटणमध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानाला वेग; 28 जुलै रोजी नगरपरिषदेत वॉर्ड सभांचे आयोजन

0
7
फलटणमध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानाला वेग; 28 जुलै रोजी नगरपरिषदेत वॉर्ड सभांचे आयोजन

ASDD (गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार) मतदारांची यादी वाचून दाखविणार; नागरिकांच्या माहितीच्या आधारे मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया

फलटण | प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेतर्फे मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत बीएसएनएल कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वॉर्ड सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted), मयत (Dead) आणि दुबार (Duplicate) म्हणजेच ASDD मतदारांची भागनिहाय यादी नागरिकांसमोर वाचून दाखविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची अधिकृत नोंद घेण्यात येईल.

सभेनंतर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

नगरपरिषद प्रशासनाने प्रत्येक प्रभागासाठी ASDD मतदारांची स्वतंत्र भागनिहाय यादी तयार केली असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट (BLA) यांनी आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेला आवर्जून उपस्थित राहून मतदार यादी शुद्धीकरणाच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, “अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा भक्कम पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वॉर्ड सभेला उपस्थित राहून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानास सहकार्य करावे.”