Sunday, August 30, 2026
Homeफलटणफलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; दिल्लीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या...

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; दिल्लीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; दिल्लीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण | प्रतिनिधी :-फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारकडून ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिली. या निधीमुळे शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे व उच्च दर्जाचे होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था मांडत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्वरित ७० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सहा महिन्यांच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या सूचनाही दिल्याचे सांगण्यात आले.

फलटण शहरासाठी यापूर्वीही विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गासाठी सुमारे ७५ कोटी रुपये, तसेच ‘मिसिंग लिंक’ मार्गासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता त्यात आणखी ७० कोटी रुपयांची भर पडल्याने शहरातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार आहे.

या निधीमुळे शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे होऊन वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि टिकाऊ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. फलटण शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून भविष्यातही विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments