Sunday, August 30, 2026
Homeफलटणफलटण बसस्थानकाचा होणार कायापालट; पीपीपी मॉडेलवर आधुनिक बसस्थानकासह २५ नवीन एसटी बसेसची...

फलटण बसस्थानकाचा होणार कायापालट; पीपीपी मॉडेलवर आधुनिक बसस्थानकासह २५ नवीन एसटी बसेसची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

फलटण बसस्थानकाचा होणार कायापालट; पीपीपी मॉडेलवर आधुनिक बसस्थानकासह २५ नवीन एसटी बसेसची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

फलटण | प्रतिनिधी :- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फलटण एसटी आगाराला भेट देऊन आगाराच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासाची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री सरनाईक यांनी फलटण बसस्थानकाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे आधुनिक पद्धतीने विकास करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

या प्रकल्पांतर्गत प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रशस्त प्रतीक्षालय, आधुनिक व्यापारी गाळे, वाहनतळ (पार्किंग), स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहे, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली तसेच अन्य आवश्यक सुविधांनी युक्त आधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एसटी महामंडळाला नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार सेवा मिळणार आहे. तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधीही उपलब्ध होतील, असे सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी फलटण एसटी आगारासाठी एकूण २५ नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५ नवीन बसेस, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी १० बसेस देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या, ग्रामीण भागातील वाहतुकीची गरज आणि एसटी सेवेची वाढती मागणी लक्षात घेऊन शासन एसटी सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. नवीन बसेस सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भेटीदरम्यान फलटण बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठीची बैठकीची व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच आगाराच्या विविध कामकाजाची पाहणी करण्यात आली. आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिले.

यावेळी शिवसेनेचे नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषदेचे सदस्य गिरीश बनकर, दत्ता बापू अनपट, दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक विकास काकडे, विशाल तेली तसेच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, एसटी आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशाकेंद्रित करण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार असल्याची ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments