
नगरसेविका प्रियांका लखन गायकवाड यांचीही नागरिकांच्या सेवेत सक्रिय साथ; पाणीटंचाईग्रस्तांना मोठा दिलासा
अकलूज प्रतिनिधी :- अकलूज शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सचिन देशमुख आणि नगरसेविका प्रियांका लखन गायकवाड यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरसेवक सचिन देशमुख यांनी स्वतःच्या स्वखर्चातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून देत दिवस-रात्र मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी नियमितपणे उपलब्ध होत आहे.
या सेवाभावी उपक्रमामुळे महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी झाली असून नागरिकांनी नगरसेवक सचिन देशमुख यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांनी दिलेला आधार हा लोकप्रतिनिधी म्हणून आदर्शवत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
नगरसेविका प्रियांका लखन गायकवाड यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असून पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकतेनुसार मोफत टँकर सेवा सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीटंचाईच्या कठीण काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत “पाणीदार नगरसेवक” अशी ओळख निर्माण करणारे सचिनजी देशमुख यांचे कार्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.










