Friday, September 11, 2026
Homeफलटणश्रीराम एज्युकेशन सोसायटीचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण...

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रम संपन्न

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रम संपन्न


फलटण | प्रतिनिधी. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचा 67 वा वर्धापन दिन बुधवारी (दि. 10 जून) श्रीराम संकुलात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे ढोल-ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रशालेचे माजी विद्यार्थी अच्युतराव खलाटे (दादा) आणि घाडगे आप्पासाहेब ज्ञानोबा यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. कु. सस्ते आर. एस. यांनी संस्थेच्या 67 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत वर्धापन दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) आणि इलेमेंटरी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे अच्युतराव खलाटे (दादा) यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाला उजाळा दिला. सन 1959 मध्ये विद्यार्थी म्हणून संस्थेत प्रवेश घेतल्याच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी संस्थापक स्वर्गीय कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उदात्त हेतूने संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले.
आज एका छोट्याशा रोपट्याचे भव्य वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समाधान व्यक्त करत त्यांनी संस्थेच्या प्रगतीचे श्रेय स्वर्गीय सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) आणि महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला दिले.
संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा सविस्तर आढावा मांडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मान्यवर, सेवानिवृत्त सेवक, गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण व बीजारोपणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जांभूळ, आंबा, चिंच, करंज आणि सुबाभूळ या वृक्षांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. तसेच शालेय परिसरात विविध प्रकारच्या सुशोभित वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., उपप्राचार्य श्री. घनवट पी. डी., सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास माध्यमिक व ज्युनिअर विभागातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अरगडे एस. टी. यांनी केले. गुणवंत विद्यार्थी सत्काराचे वाचन श्री. यादव एस. डी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. सस्ते सी. एस. यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments