एन. रघुरामन यांचा कॉलम: आपल्या हिंसक प्रवृत्तीची इतर कुणाला तरी किंमत माेजावी लागते

0
1
एन. रघुरामन यांचा कॉलम:  आपल्या हिंसक प्रवृत्तीची इतर कुणाला तरी किंमत माेजावी लागते




भोपाळमधील सर्वात गजबजलेला रस्ता. संध्याकाळची वेळ असल्याने प्रत्येकालाच घरी पोहोचण्याची घाई. पण, या घाईतच अचानक वाहतूक ठप्प झाली. ही कोंडी कोणत्याही रस्त्याच्या कामामुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे नव्हती तर दोन वाहनचालकांमधील अहंकारातून झाली होती. एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे किरकोळ अपघात झाला. त्याचे रूपांतर पुढे वाद आणि भांडणात झाले. दोघेही रस्त्याच्या मधोमध उभे राहून एकमेकांवर ओरडत होते. एखाद्या खंदकात मोर्चा लढवणारे जणू सैनिक. भांडण जिंकण्याच्या ईर्षेने ते एवढे आंधळे झाले होते की, आपल्यामुळे मागे वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे, याचेही भान त्यांना नव्हते. या कोंडीत अडकलेली निष्पाप माणसे त्यांच्या अहंकाराचे बळी ठरत होती. त्या गर्दीत कदाचित भुकेने व्याकुळ झालेले एखादे मूल रडत असेल, तर कुणी गंभीर रुग्ण छातीवर हात ठेवून डॉक्टरकडे पोहोचण्याची प्रतीक्षा करत असेल. चालकांच्या रागाने इतरांचे जगणे कठीण केले होते. माणसाच्या याच प्रवृत्तीमुळे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील एका हृदयद्रावक घटनेची आठवण झाली. ही कथा आहे ‘सनी’ची. ही कथा मी अलीकडेच वाचली होती. फेब्रुवारी महिन्यात रशियन ड्रोनने युक्रेनच्या जपोरिज्जिया शहरावर हल्ला केला होता. प्रसारमाध्यमांनी नेहमीप्रमाणे पडलेल्या इमारती, आर्थिक नुकसान आणि दु:खद रूपाने संपलेल्या मानवी जीवनाचा वृत्तांत दिला. पण या ढिगाऱ्यात ‘सनी’ ही जखमी अवस्थेत पडला होता. युद्धातल्या अधिकृत आकड्यांमध्ये या मुक्या जीवाची कुठेच नोंद नव्हती. वेरोनिका कोन्कोवा या संवेदनशील जीवशास्त्रज्ञाने त्या ढिगाऱ्यातून सनीला बाहेर काढले. या घुबडाचा डावा डोळा निकामी झाला होता आणि एक पंख पूर्णपणे तुटला होता. त्याला एका डब्यात ठेवून रुग्णालयात पोहोचवण्यात आले. उपचारादरम्यान सनीचा तो पंख कापून टाकावा लागला. आता तो प्रकाशालाही प्रतिसाद देऊ शकत नाही. घनदाट जंगलात उडण्याऐवजी तो आता एका पिंजऱ्यात जमिनीवर लंगडत फिरतो. त्याच्यासोबत तिथे इतरही अनेक जखमी पक्षी आहेत. त्यात दुर्मिळ गरुड, काळे घार आणि पेरेग्रीन ससाणे यांचा समावेश आहे. मानवी युद्धे वन्यजीवांचे नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त करतात. स्थलांतर करणारे पक्षी युद्धक्षेत्रावरून उडताना थकून प्राण गमावतात. मोठे प्राणी स्फोटांच्या आवाजाने घाबरून मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. समुद्रातील स्फोटांमुळे जलचरांचे आयुष्य धोक्यात येते. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, वेरोनिकाच्या केंद्रात असलेले हे पक्षी आता कधीच जंगलात परतू शकणार नाहीत. त्यांची नैसर्गिक शिकार करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली आहे. आता ते अन्नासाठी पूर्णपणे माणसावर अवलंबून आहेत. एवढेच नव्हे तर जंगलात उरलेली जनावरेदेखील अस्वाभाविक वर्तन करू लागले आहेत. प्राण्यांमधील मानसिक बदलांना या आघाडीवर प्रत्यक्ष काम करणारे सैनिक व जीवशास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. निसर्ग ना कधी युद्धविराम करू शकत, ना कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू शकतो. तो फक्त मानवी हिंसेचा त्रास मूकपणे सहन करतो. भोपाळच्या रस्त्यावर भांडणारे दोन चालक असोत, युरोपच्या भूमीवर एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागणारे दोन देश असोत किंवा बंद दाराआड भांडणारे आई-वडील असोत – संघर्षाचे सूत्र सगळीकडे सारखेच आहे. भांडणाऱ्यांचे लक्ष फक्त एकमेकांवर असते. पण त्यात होणाऱ्या नुकसानीची किंमत मात्र इतर निष्पाप जीवांना मोजावी लागते. आई-वडिलांच्या भांडणामुळे खोलीत स्वतःला कोंडून घेणारे घाबरलेले मूल, ट्रॅफिक जाममुळे रुग्णालयात पोहोचू न शकणारा रुग्ण आणि पिंजऱ्यात पंखांविना फडफडणारे घुबड – हे सगळे दुसऱ्याच्या हिंसेची किंमत मोजत असतात.

फंडा असा की, मानवी हिंसेमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या तिसऱ्या निष्पाप जीवाला किंमत मोजावी लागते. संघर्ष सुरू करण्यापूर्वी आपण कधी या या लोकांचा विचार करणार आहोत का?



Source link