
महाभिनिषक्रमण
साहस Times : खालील हे दोन्हीही शिल्प एकाच प्रसंगावर आधारित आहेत, एक शिल्प स्थविर्वादी मान्यतेप्रमाणे आहे तर दुसरे महासांघीक मान्यतेप्रमाणे आहे , स्थवीरवादी शिल्पपट महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील पितळखोरा लेणीवर होते, जी कन्नड तालुक्यातील काळीमठ जवळील पाटणा गावाच्या नजीक असलेल्या सातमाळ पर्वतरांगेतील आद्य लेणी आहे ,
इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सातवाहन राज्य काळात ही लेणी निर्माण करण्यात आली होती, तेव्हा आज आपण पाहतो तसे सम्यक संबुध्द यांचे मानवीय स्वरूपातील बुध्द रूप तयार झालेले नव्हते तेव्हा सम्यक संबुध्दांचे अस्तित्व प्रतिकांच्या माध्यमातून मांडण्यात येत असे , स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना शिल्पात अथवा चित्रात मांडणे मान्य नव्हते तेव्हा सिध्दार्थ गौतम यांच्या जीवनाला जो कलाटणी देणारा प्रसंग आहे जो बुध्दत्व प्राप्त करून सम्यक संबुध्द बनण्याच्या घटनाक्रम आहे तो इथे सुंदररीत्या साकारण्यात आला आहे. सिद्धार्थ गौतम यांच्या गृहत्यागाला महाभिनिषक्रमण असे बौद्ध साहित्यातून संबोधण्यात आले आहे , तो प्रसंग लेखनाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्राचीन बौध्द साहित्यातून आलेला आहे त्याला कलाकारांनी दगडात परावर्तित केले आहे त्यावर आधारित हे शिल्प आहे.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रसंगाला आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण शोध ग्रंथातून शब्दबद्ध केलेला आहे, हा प्रसंग त्यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पध्दतीने मांडलेला आहे, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकाला गोसेफल ऑफ बुद्धा हे नाव देण्याचे ठरवले होते पण भारतीय मनाला भारतीय समाजाला ते नाव रुचणार नाही म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचे नाव बुद्धा अँड हीज धम्मा असे नाव दिले.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकात तो प्रसंग शब्दबद्ध केलेला आहे , शाक्य आणि कोलीय ( कोलीय म्हणजे आजचे कोळी ) यांच्यात पाण्याच्या वाटपावरून वाद होतो , शाक्यांच्या संघातून कोलियांच्या विरोधातात युध्दाचा ठराव मांडला जातो ज्याला सिध्दार्थ गौतम हे विरोध करतात , संघाच्या ठरावाच्या विरोधात गेल्या कारणाने संघाने ज्या शिक्षा दिलेल्या होत्या त्याच्यापैकीच एक गृहत्यागाची म्हणजेच देश त्यागाची शिक्षा होती जी सिध्दार्थ गौतम यांनी स्वीकारलेली होती, संघाकडून मिळालेल्या शिक्षेची वार्ता सिद्धार्थ गौतम घरी पोहोचण्या आधीच घरी पोहोचली होती , आपल्या आई-वडिलांची पत्नीची आणि आप्तस्वकीयांची भेट घेऊन सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केले होते.
आता आपण शिल्प पाहुया
पितळखोरा लेणी ज्या पहाडात कोरण्यात आलेली आहे तिचा दगड हा मृदू स्वरूपातील असल्या कारणाने तिथे अनेक सुट्टे शिल्प खाली वेगळे तयार केले गेले होते म्हणजे सुट्ट्या शिळेवर कोरून मग ते अर्ध उठावातील शिल्प लेणीच्या स्थापत्यात सुशोभिकरण करण्यासाठी वापरले गेले होते. मातकट रंगाच्या दगडाच्या शिळेवर हे शिल्प साकारण्यात आलेले आहे , इथे सिध्दार्थ गौतम यांचे अस्तित्व स्थापित करण्यासाठी त्यांच्याशी निगडीत असलेल्या गोष्टींचा वापर करण्यात आलेल्या आहेत. वरच्या भागापासून सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की सांची स्तूपावर ज्या पद्धतीचे तोरण द्वार आहेत तशाच प्रकारचे तोरण द्वाराचे अंकन इथे उत्कीर्ण केलेले आपल्याला डाव्या कोपऱ्यात पाहता येईल हे आपल्या राज्याच्या बाहेर सीमारेषा ओलांडून जाण्याचे प्रतीक आहे, आपल्या नगराच्या राज्याच्या सीमेरेषेच्या बाहेर पडणारी वेस म्हणून इथे तोरण द्वार उत्कीर्ण केले गेले आहे , त्या तोरण द्वाराच्या बरोबर उजव्या बाजूला एक व्यक्ती हा प्रसंग पाहत आहे जो आपल्या राज्याच्या सीमेवर रक्षणार्थ तिथे उभा आहे , राज वैभवाचे प्रतीक म्हणून खाली मौल्यवान आभूषणांनी सजवलेला एक घोडा दिसून येत आहे जो सिध्दार्थ गौतम यांचा आवडता घोडा कंठक आहे जो मंद पण जड पावले टाकतांना मार्गस्थ झालेला दिसून येत आहे जे राज वैभव त्यागण्याचे प्रतीक आहे या घोड्यावर छत्र धरले गेले आहे जे राज शासनाचे प्रतीक आहे, मार्गस्थ झालेल्या घोड्याच्या पुढे सेवेकराच्या भूमिकेत एक व्यक्ती दिसून येत आहे. शिल्पातील सर्व व्यक्तिरेखा गतिमान आहे हे स्थापित करण्यासाठी कलाकाराने छान कल्पकता वापरली आहे ही व्यक्ती चालत आहे गतीमान ( चलचित्र समान आहेत) आहे हे दाखवण्यासाठी कलाकाराने या व्यक्तीस पुढे किंचित झुकवलेले आहे त्यामुळेच त्याच्या पुढच्या पायावर जोर आल्याने त्याचा पुढचा पाय गुडघ्यात दुमडलेला आहे व मागचा पाय उचलून पुढे टाकण्याच्या प्रयत्नात आहे ही प्रक्रिया संपूर्ण शिल्पाला गतिमानता प्राप्त करून देत आहे , ही घोड्याच्या पुढे चालणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही व्यक्ति सिध्दार्थ गौतम यांचा खासगी सेवक छन्न आहे. इतर व्यक्तींनी जसे कपडे परिधान केले आहेत त्याहून उमद्या वयाच्या छन्नाचे कपडे वेगळे आहेत त्याने धोतरा समान नेसू नेसलेले आहे तर त्याचा फेटा देखील मौर्य सातवाहन कालीन समोर गाठीचा असतात तसा नसून पागोटे बांधावेत तसे आहे त्याने कानात जी कर्ण फुले घातली आहेत ती सहज आपले लक्ष वेधून घेतात, इथे विशेष म्हणजे छन्नाच्या एका हातात अखुड पात्याचे खड्ग आहे तर दुसर्या हातात ढाळण्यासाठी चवरी आहे वारा घालण्यासाठी , महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत त्यातून दिसून येणारे सम्यक संबुध्दांच्या शिल्पांच्या शेजारी चवरी ढाळणारे सेवेकर्यांच्या भूमिकेत बोद्धीसत्व पद्मपाणी व बोद्धीसत्व वज्रपाणी दिसून येतात, दोघांच्याही हातात हवा घालण्यासाठी चवरी असते पण इथे मात्र छन्न आपल्याला त्या भूमिकेत दिसून येत आहे कारण सम्यक संबुध्द व बोद्धीसत्व यांची शिल्प तयार होण्याचा काळ अद्यापपर्यंत आलेला नव्हता तो काळ पुढे यायचा होता.
इथे एक बाब समजून घेणे आवश्यक आहे की सिद्धार्थ गौतम यांना वगळून त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी दाखवून त्यांचे अस्तित्व इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या शिल्पाकृतीतून झालेला आहे. त्यांच्या नसण्यातुन त्यांच्या असण्याचे प्रकटीकरण प्रत्यक्षरित्या इथे करण्यात आलेला आहे.
पुढचे शिल्प समजून घेण्यासाठी आपल्याला थेट आपला दख्खनचा प्रदेश सोडून हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्राचीन काळातील गांधार प्रदेशात जावे लागेल जो आज अफगाणिस्तान मधला कंधार आहे तिथे जावे लागेल जिथे या शिल्प शैलीचे उगमस्थान आहे, कुषाण घराण्यातील दुसरे शासक देव पुत्र कनिष्क यांच्या कारकिर्दीमध्ये या शिल्पाची निर्मिती झाली आहे , या शैलीला गांधार शैली असेल संबोधित केले जात असे, प्राचीन काळात तीन प्रमुख शिल्पशैली होत्या त्याच्यापैकीच ही एक, प्रथम होती गांधार शैली दुसरी होती मथुरा शैली आणि तिसरी होती अमरावती शैली ज्या भूभागातून ज्या शैलीचा उगम स्थान आहे त्याच नावाने त्या शिल्पशैलीला नाव देण्यात आले होते.
गांधार शैलीला इंडोग्रीक शैली असे ही म्हणतात जी भारतीय आणि ग्रीक यांच्या मिश्रणातून तयार झाली आहे , राखाडी रंगाच्या छान दगडातून ही सर्व शिल्प साकारली गेली आहेत.
गांधार शैलीतील महाभिनिष्क्रमणाचे शिल्प कलेच्या शिल्पाकृतीच्या अनुषंगाने विकसित आहे, छोट्याशा शिल्पपट्टीमध्ये अनेक व्यक्तिरेखा दिसत आहेत , शिल्पाच्या व आपल्या उजव्या बाजूच्या कोपर्यात स्तंभ दिसत आहे जो घडीव आहे ते राजमहालातून बाहेर पडण्याचे प्रतीक आहे म्हणून त्याला पाठीमागे ठेवले गेले आहे, शिल्पातील सर्व व्यक्ती त्याला पाठ करून आहेत राज महालाच्या बाहेर सिध्दार्थ गौतम पडले आहेत गृहत्याग केले आहे म्हणून त्याला मागे स्थान दिले गेले आहे हा सर्व प्रसंग महालाच्या बाहेर घडत आहे हे कलाकाराला सुचवायचे आहे, स्तंभाच्या पुढे मध्यम अंगकाठी असलेली मध्यम वयाची एक व्यक्ती सिध्दार्थ गौतम यांच्यावर छत्र धरून आहे त्यांच्या हातातील छत्राचा दांडा व छत्र खुप काळजीपूर्वकपणे तयार केले गेले आहे ते राज वैभवचा प्रतीक म्हणून इथे वापरण्यात आलेले आहे , शिल्पातील व्यक्तीचे केस हे झुपकेदार असून त्यांची गाठ तयार करून वर बांधण्यात आली आहे त्यांच्या चेहर्यावर पिळदार मिश्या आहेत तर चेहऱ्यावरील भाव हे काहीसे गंभीर आहेत तर चेहरा काहीसा मागे झुकलेला आहे त्यांनी कानात गळ्यात हातात मोजकीच अभूषणे ल्यायलेली आहेत तसेच खांद्यावरून रूळणारा शेल्या समान कापड आहे व खाली अधोवस्त्र हे धोतरा समान आहे व पायात कोणत्याही प्रकाराचे पायताण नाही, त्याच्यांच वरती खरंतर ते वरती नसून मागे आहेत पण आपल्या नजरेस पडायला हवे म्हणून कलाकाराने त्यांना वरच्या भागात जागा दिली आहे. त्याकाळात थ्रीडी डायमेन्शन विकसित झालेले नव्हते म्हणून ते आपल्याला मागे न दिसता वर दिसत आहेत,वज्र हातात घेऊन उभी असलेली व्यकी म्हणजे ग्रीक पौराणिक कथेतील सुप्रसिद्ध अलौकिक व्यक्तीरेखा हरक्युलीस आहे जो रक्षण करता (प्रोटेक्टर) म्हणून इथे दर्शवण्यात आलेला आहे . गांधार शिल्पकले मधले विशेषता म्हणजे सिद्धार्थ गौतम ज्या घोड्यावर बसलेले आहेत त्या घोड्याला इथे खाली दोन यक्षांनी हवेत तोलून धरलेले आहे, याचे कारण आहे की सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्या केले आहे घर सोडत असताना घोड्यांच्या टापांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ नये म्हणून त्यांच्या खुराना अलगदपणे त्यांनी उचललेले आहे.
वरील दोन्हीही शिल्प सिद्धार्थ गौतम यांचे बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरचे आहेत संबोधी प्राप्त केल्यानंतरचे आहेत त्यामुळे दोन्हीं शिल्पांमधला फरक म्हणजे एक शिल्प स्थाविर्वादी मान्यतेप्रमाणे आहे तर दुसरे महासांघीक संप्रदाय मान्यतेप्रमाणे आहे , बुद्ध धम्मातील दोन पंथांमधला फरक एवढाच आहे की स्थविर्वादी संप्रदायाप्रमाणे सिद्धार्थ गौतमांचं नसणे म्हणजेच त्यांचे आसणे हॊय व महासांघीकांमध्ये सिद्धार्थ गौतम यांचे अस्तित्व सरळ सरळ स्थापित केले गेले आहे हे दोन्ही शिल्प दोन वेगळ्या ठिकाणी आहेत पितळखोऱ्यावर सापडलेले शिल्प आज दिल्ली वस्तू संग्रहालय मध्ये असून व गांधार शिल्पकलेतील शिल्प आज आपल्याला अफगाणिस्ताना व पाकिस्तानच्या वस्तू संग्रहालयात पाहण्यास मिळतात.
पण आज जर आपल्याला महाभिनिषक्रमण शिल्प पाहायचे झाल्यास आपण कर्नाटक मधील कणगणहल्ली (सन्नती ) स्तुपावरती पाहू शकतो.
पांथस्थच्या माध्यमातून आपण ऑगस्ट महिन्यात सन्नती ( कर्नाटक) अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये हे शिल्प आपण उपस्थितांना दाखवणार आहोत, समजून सांगणार आहोत ज्या सदस्यांना पांथस्थच्या सोबत अभ्यास दौऱ्यात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून समूहात जोडून घ्यायचे व अधिक माहिती जाणून घ्यायची आहे अभ्यास दौऱ्यावर येणार असाल तर नक्कीच समूहात जोडून घ्या येणार नसाल तर जोडून घेऊ नका ही विनंती.
सन्नती अभ्यास दौऱ्याची लिंक : https://chat.whatsapp.com/EHIhwDGsrGgG9YDtI6YZS9
सूरज रतन जगताप
( लेणी अभ्यासक )







