
फलटणमध्ये बुद्ध जयंती मिरवणुकीत तणाव; पोलीस निरीक्षक व कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक, व्हिडिओ व्हायरल
फलटण : शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश (आप्पा) काकडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर टीका होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्ध जयंतीची मिरवणूक शांततेत सुरू असताना पोलीस निरीक्षकांनी हस्तक्षेप करत वाद्ये बंद करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मिरवणूक काही काळ थांबली. “पारंपरिक वाद्यांना वेळ असतानाही पोलीस जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत,” असा आरोप करत हरिश काकडे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली.
या घटनेनंतर पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिरवणुकीदरम्यान गर्दीतून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच मिरवणुकीच्या अगदी पुढे पोलीस गाड्या चालत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. शांततेत सुरू असलेल्या मिरवणुकीत अशा प्रकारे पोलिसांची भूमिका का होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बुद्ध जयंती हा शांतता आणि संयमाचा संदेश देणारा पवित्र दिवस मानला जातो. अशा प्रसंगी प्रशासनाने सहकार्य करण्याऐवजी अडथळा निर्माण केल्याचा आरोप बौद्ध अनुयायांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली आहे.
या प्रकारामुळे काही काळ फलटणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नागरिकांच्या संयमी भूमिकेमुळे कोणताही अनर्थ टळला. आता या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकारी काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







