
सातरा :- सातारा येथे झालेल्या भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना थेट इशारा दिला. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांच्या साक्षीने त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत आगामी राजकीय लढाईची दिशा स्पष्ट केली.
आपल्या भाषणात शिंदे यांनी वाघाच्या उदाहरणाचा उल्लेख करत सांगितले की, वाघ कधीही विनाकारण हल्ला करत नाही; मात्र त्याला डिवचल्यास तो थेट झडप घालतो. याच धर्तीवर त्यांनी “पहले मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन मुझे छेड़ा तो किसीको छोड़ता नहीं!” असे ठणकावत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि वातावरण तापले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. “फक्त आरोप-प्रत्यारोप करून लोकांचा विश्वास मिळत नाही; काम करून दाखवावे लागते,” असे सांगत त्यांनी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्रातील योजना आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीभोवती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांमध्ये सुरू असलेल्या हालचाली, नाराजी आणि बदलती समीकरणे यामुळे सत्तास्थापनेचा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरली.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संघटन बळकट करण्यावर विशेष भर दिला. “तळागाळात काम करा, प्रत्येक गावात पोहोचा आणि पक्षाची ताकद वाढवा,” असे आवाहन करत त्यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेला गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले. कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय वर्तुळात शिंदे यांच्या या आक्रमक भाषणाकडे आगामी निवडणुकांची रणनीती म्हणून पाहिले जात आहे. साताऱ्यातील ही सभा केवळ शक्तिप्रदर्शन नसून जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या समीकरणांवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.






