Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटणमध्ये गॅस तुटवड्याचा गंभीर परिणाम : हॉटेल व्यवसाय ठप्प, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची...

फलटणमध्ये गॅस तुटवड्याचा गंभीर परिणाम : हॉटेल व्यवसाय ठप्प, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

फलटण :- फलटण तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करत गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अन्न हा जीवनावश्यक घटक असल्याने गॅस अभावी हॉटेल चालकांना अन्न शिजवणे कठीण झाले असून ग्राहकांना सेवा देण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.
फलटणमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटक येत असतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रामुख्याने हॉटेल्सवर अवलंबून असते. मात्र गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक हॉटेल्सना सेवा बंद ठेवावी लागत असून, त्यामुळे ग्राहकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
यासोबतच, हॉटेल व्यवसायाशी संबंधित असंख्य कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून कर्ज घेतले असून, उत्पन्न घटल्यामुळे कर्जफेड करणेही कठीण झाले आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून हॉटेल असोसिएशनने प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आणि हॉटेल व्यवसायिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि कोणत्या ठोस उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना काळातील योगदानाची आठवण
कोरोना महामारीच्या कठीण काळात हॉटेल व्यवसायिकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःच्या जीवाची व आर्थिक नुकसानीची पर्वा न करता नागरिकांना अन्नपुरवठा केला होता. लॉकडाऊनच्या काळात अनेक हॉटेल्स सुरू ठेवून त्यांनी गरजू नागरिक, रुग्ण आणि प्रशासनाला मोठे सहकार्य केले होते.
आता पुन्हा एकदा संकटाचा सामना करत असताना, “आम्ही समाजासाठी उभे राहिलो, आता शासनाने आमच्या पाठीशी उभे राहावे,” अशी भावना हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
हॉटेल व्यवसाय टिकवण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड सेवा देण्यासाठी गॅसचा नियमित व पुरेसा पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments