7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशाचा सन्मान करण्यासह लैंगिक समानता, सक्षमीकरण आणि हक्कांसाठी जागृती करण्याचा, तसेच महिलांवरील अत्याचार विरोधी लढ्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे.
इतिहास : २०व्या शतकाच्या सुरुवातीला, अमेरिकेतील कामगार चळवळीतून आणि रशियातील महिलांच्या ‘ब्रेड ॲंड पीस’ (अन्न आणि शांतता) आंदोलनातून या दिवसाची सुरुवात झाली. १९१० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत ८ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली.
उद्देश : महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि लिंगभेद विरहित समाज प्रस्थापित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
सक्षमीकरण : हा दिवस महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करतो आणि समान संधींची मागणी करतो.हा दिवस केवळ सन्मान करण्याचा नाही, तर महिलांना समान संधी आणि सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार करण्याचा देखील आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वात पहिला जागतिक सोहळा
२८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला “महिला दिन” हा सर्वात पहिला जागतिक महिला दिवस होता. यामुळे १९१० च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना “एक विशेष महिला दिन” दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले, पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही; पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाला. १९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली; त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती.
भारतातील प्रथम महिला दिवस सोहळा
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, आणि इतर कार्यालयांमधूनही ८ मार्च हा महिला दिवस साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन जगभर सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.
जागतिक महिला दिवस आणि आपली भूमिका
स्त्री आहे म्हणून कुटुंब, समाज आणि जगात सर्व मानव जातीचे अस्तित्व आहे. स्त्री शिवाय दगड विट आणि सिमेंट ने बनवलेल्या वास्तुला घरपण येत नाही. घर म्हणायचं तर त्या घरात आई, माता,बहीण, मुलगी, पत्नी या स्वरूपात महिला असणे गरजेचे असते.
एका कुटुंबाचा सुनियोजित असा निर्वाह करणारी स्त्री संपूर्ण कुटुंबाच्या प्रगती व उत्कर्षाचा प्रमुख आधार असते. कुटुंबात स्त्रीच्या समजूतदार पणाने प्रत्येक प्रसंगात घेतलेल्या समर्पक भूमिकेमुळे घर ना केवळ टिकते तर ते पुढे ही जाते.
स्त्री म्हणजे एक खडतर मार्गाने चालत अशक्य ते शक्य करून दाखवणारी, प्रत्येकाच्या आयुष्यात विविध भूमिकेत खंबीरपणे पाठीशी उभे राहणारी एक समजदार साथ संगत असते. म्हणूनच समस्त महिलांचा, त्या ज्या भूमिकेत आहेत त्या प्रत्येक भूमिकेचा कृतज्ञता पूर्वक आदर सन्मान केला पाहिजे. पुरुषांना आहेत ते सर्व हक्क महिलांना दिले पाहिजेत. स्त्री, महिला आहेत म्हणूनच आपण ही अस्तित्वात आहोत हे कोणीही कधीही विसरू नये. महिलांवर अत्याचार होऊ नयेत, त्यांचे कसल्याही प्रकारे, कुठेही, कधीही शोषण होऊ नये या बाबत प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच आजच नाही तर प्रत्येक दिवस महिलांच्या नावाने असावा कारण त्या न थांबता सर्व कामं करतात. आज महिला जगात प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने व आघाडीवर आहेत. आज बहुसंख्य महिला सुशिक्षित होऊन कमावत्या झाल्या आहेत. अनेक महिला सक्षमपणे संसाराचा गाडा ओढताना दिसतात. महिला आहेत म्हणूनच आपणही आहोत हेच अंतिम सत्य. आजच्या दिवशी या सत्याचा पवित्रतेने स्वीकार करावयाचा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना कृतज्ञता पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
(बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगर)





